Join us

‘लगान’मधील ईश्वर काकाचे निधन; पॅरालिसिस अटॅकमुळे बिघडली होती प्रकृती!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2018 12:31 PM

अभिनेता आमिर खान याच्या ‘लगान’ या चित्रपटात ईश्वर काकाची भूमिका साकारणारे श्रीवल्लभ व्यास (६०) यांचे दीर्घ आजाराने रविवारी जयपूर ...

अभिनेता आमिर खान याच्या ‘लगान’ या चित्रपटात ईश्वर काकाची भूमिका साकारणारे श्रीवल्लभ व्यास (६०) यांचे दीर्घ आजाराने रविवारी जयपूर येथे निधन झाले. काही वर्षांपूर्वी त्यांना एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पॅरालिसिसचा झटका आला होता. ज्यामुळे त्यांची प्रकृती प्रचंड खालावली होती. काही दिवसांपासून ते केवळ लिक्विड डायटवर होते. २०१३ मध्ये उपचारासाठी त्यांचा परिवार जेसेलमेर येथून जोधपूरला शिफ्ट झाला होता. त्यांची पत्नी शोभा व्यास यांच्या मते, सिने आणि टेलिव्हिजन असोसिएशनने त्यांना कुठल्याही प्रकारची मदत केली नाही.  शोभा यांनी सांगितल्यानुसार, आमिर खान याने आम्हाला आर्थिक आणि नैतिक मदत केली. त्याच्या मदतीमुळेच आम्ही जयपूर येथे ३ बेडरूमचे घर भाडेतत्त्वावर घेऊ शकलो. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला माझ्या खात्यावर त्याच्याकडून ३० हजार रुपये जमा केले जात होते. आमिर माझ्या मुलीच्या शाळेचा खर्च आणि श्रीवल्लभ यांचा मेडिकल खर्चही करायचा. आमिर व्यतिरिक्त या कठीण प्रसंगात इमरान खान आणि मनोज वाजपेयी यांनीही मदत केली. दरम्यान, आॅक्टोबर २००८ मध्ये श्रीवल्लभ गुजरातच्या राजपीपला या भागात एका भोजपुरी चित्रपटाची शूटिंग करीत होते. याचदरम्यान ते हॉटेलमधील बाथरूममध्ये पडले. डोक्याला गंभीर मार लागल्याने ते बेशुद्ध झाले होते. चित्रपटाच्या क्रू मेंबर्सनी त्यांना लगेचच वडोदरा येथे हलविले होते. त्याठिकाणी रुग्नालयात त्यांच्या डोक्याचे आॅपरेशन करण्यात आले. श्रीवल्लभ व्यास यांची पत्नी शोभाच्या मते, त्यांच्या आजारपणामुळे आम्हाला दोन वर्षांत तीन घरे बदलावी लागली. कारण आजारी व्यक्तीला घर देण्यास लोक नकार देत होते. दरम्यान, श्रीवल्लभ व्यास यांच्या पश्चात शिवानी आणि रागिनी या दोन मुली आहेत. व्यास यांची इच्छा होती की, दोन्ही मुलींनी चित्रपटांमध्येच काम करावे. शिवानीने डिझायनिंगचा कोर्स केला आहे तर रागिनी इयत्ता बारावीत आहे. श्रीवल्लभ यांनी अनेक बॉलिवूडपटांमध्ये काम केले.