सलमान खान हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. सलमान खान गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खानला वारंवार धमक्यांचे फोन येत आहेत. पैशांची मागणी करुन सलमानला वारंवार धमक्यांचे फोन येत असून या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आलीय. याप्रकरणी एका गीतकाराला अटक केली असून सोहेल पाशा असं त्याचं नाव आहे. सोहेलने काही दिवसांपूर्वी ५ कोटी रुपयांची मागणी करुन सलमानला धमकी दिली होती. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
सलमान खान धमकी प्रकरणी गीतकाराला अटक
२४ वर्षीय सोहेल पाशा हा गीतकार असून त्याने ७ नोव्हेंबरला मुंबई ट्रॅफिक पोलीस यांच्या हेल्पलाईन नंबरवर सलमानला धमकीवजा संदेश पाठवले होते. "संदेश पाठवणारा माणूस हा बिष्णोई गँगचा सदस्य आहे. जर सलमानने ५ कोटी रुपये दिले नाहीत तर अभिनेत्याची हत्या करण्यात येईल", असा संदेश यामध्ये होता. विशेष म्हणजे सोहेल पाशाने सलमानसाठी 'में सिकंदर हू' हे गाणं लिहिलं आहे. सलमानवर लिहिलेलं 'में सिकंदर हू' गाणं प्रसिद्ध व्हावं म्हणून त्याने भाईजानला धमकी पाठवल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. अखेर गीतकार सोहेल पाशाला पोलिसांनी कर्नाटक येथील रायचूर भागातून अटक करण्यात आलीय.
गीतकाराने पब्लिसिटी स्टंटसाठी पाठवली धमकी
धमकी येताच पोलिसांनी नंबर ट्रॅक करण्यास सुरुवात केली. रायचूर कर्नाटक येथून नंबरचं लोकेशन मिळताच कर्नाटक पोलिसांची एक टीम चौकशीसाठी रवाना झाली. व्यंकटेश नारायण हा मोबाईल नंबरचा मालक असल्याचं पोलिसांना समजलं. आरोपी सोहेलने व्यंकटेशच्या मोबाईल नंबरचा OTP द्वारे वापर करुन सलमानला धमकी देणारा संदेश पाठवला होता. पोलिसांना हे समजताच त्यांनी सोहेल पाशाला बेड्या ठोकून त्याला वरळी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सध्या पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत.