पाकिस्तानात बॉलिवूड चित्रपटांबाबत घेतला गेला हा निर्णय...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2016 9:56 PM
पाकिस्तानातील चित्रपटगृहांमध्ये लावण्यात आलेला बॉलिवूड चित्रपटांवरील प्रतिबंध हटविण्यात आला आहे. ३० सप्टेंबरपासून भारतीय चित्रपटांचे प्रदर्शन करण्यावर पाकिस्तानात अनिश्चित काळासाठी ...
पाकिस्तानातील चित्रपटगृहांमध्ये लावण्यात आलेला बॉलिवूड चित्रपटांवरील प्रतिबंध हटविण्यात आला आहे. ३० सप्टेंबरपासून भारतीय चित्रपटांचे प्रदर्शन करण्यावर पाकिस्तानात अनिश्चित काळासाठी बॅन लावण्यात आला होता. आता सोमवारपासून पाकिस्तानात बॉलिवूड चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. ‘डान आॅनलाईन’ने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानातील चित्रपटगृहांवर बॉलिवूड चित्रपटांच्या प्रदर्शनावर लावण्यात आलेली बंदी मागे घेण्यात आली आहे. आता पुन्हा बॉलिवूडचे चित्रपटांचे प्रदर्शन पाकिस्तानी चित्रपटगृह मालकांना करता येणार आहे. भारतीय सीमेवरील उरी दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलावंतांवर बंदी लावण्यात यावी अशी मागणी राजकीय पक्षांनी केली, यानंतर हा वाद वाढत गेला होता. याच पाश्वभूमीवर बॉलिवूड चित्रपटांचे प्रदर्शन अनिश्चितकाळासाठी थांबविण्याचा निर्णय ३० सप्टेंबर रोजी पाकिस्तानातील चित्रपटगृह मालकांनी घेतला होता. डॉनने दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तानातील चित्रपटगृहाचे मालक सोमवारपासून बॉलिवूड चित्रपटांचे प्रदर्शन सुरू करणार आहेत. सुरुवातीला असे चित्रपट प्रदर्शित करण्यात येतील जे बंदीमुळे पाकिस्तानात प्रदर्शित होऊ शकले नव्हते. पाकिस्तानी चित्रपटगृह मालकाच्या प्रतिक्रि येनुसार, आम्ही सिनेमा संघाच्या माध्यमातून लावण्यात आलेला प्रतिबंध मागे घेतला ओह. आम्ही त्यांच्या (भारतीय चित्रपट व कलावंत )समर्थनार्थ हा निर्णय घेतला असून ते देखील आमचे (पाकिस्थानी चित्रपट व कलावंत)समर्थन करतील अशी आशा आहे. पाकिस्तानात बॅन मागे घेतल्यावर सर्वांत आधी नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनित ‘फ्रीकी अली’ या चित्रपटाचे प्रदर्शन केल जाणार आहे. बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलावंतांनी काम करू नये अशी मागणी करीत मनसेने आंदोलन केले होते. यानंतर भारतातील चित्रपटगृह मालकांनी पाक कलावंत असलेले चित्रपट प्रदर्शित करणार नाही असा निर्णय घेतला होता. या वादाचा फटका करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाला बसणार असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी एक शिष्टमंडळ गृहमंत्री राजनाथ सिंग यांना भेटले होते. भारतात पाक कलावंतांचा विरोध होत असतानाच पाकिस्तानात बॉलिवूड चित्रपटांवर बंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता.