नवी दिल्ली - पंजाबी अभिनेता दीप सिद्धू (Deep Sidhu) याचा कार अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी दिल्लीहून पंजाबला जात असताना दीपच्या कारची ट्रकला जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, त्याचा जागीच मृत्यू झाला. धडकेत गाडीच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे फोटो पाहायला मिळत आहेत. पंजाबला येत असताना कुंडली-मानेसर-पलवल एक्स्प्रेस वेवर पिपली टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला जाहीर पाठींबा दिल्यानंतर दीप सिद्धू चर्चेत आला होता. अपघाताच्या वेळी तो त्याची गर्लफ्रेंड रीना रायसोबत (Reena Rai) होता.
भीषण अपघातात सुदैवाने रीनाचा जीव वाचला आहे. दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर तिने फोटोंसह एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर दीप सिद्धूसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. "मी पूर्णपणे तुटलेय. मी आतून मरण पावलेय. प्लीझ तू तुझ्या सोलमेटजवळ परत ये. तू मला वचन दिलं होतंस की, तू मला कधीही सोडून जाणार नाहीस. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तू माझ्या हृदयाचा ठोका आहेस" असं रीनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिची हा पोस्ट वाचून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत.
"आपण एकत्र मिळून आपल्या भविष्याच्या योजना आखत होतो"
"मी आज हॉस्पिटलच्या बेडवर असतानाही मला माहीत आहे की तू कायम माझ्यासोबत आहेस. आपण एकत्र मिळून आपल्या भविष्याच्या योजना आखत होतो. आता तू निघून गेलास. पण सोलमेट्स एकमेकांना सोडत नाहीत. मी तुला पुन्हा भेटेन, दुसऱ्या जगात" असं देखील रीनाने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यामध्ये घडलेल्या प्रकरणातही दीप सिद्धू आरोपी होता. त्या प्रकरणात दीपला काही महिने तुरुंगातही जावे लागले होते. सध्या तो जामीनावर बाहेर होता.
कोण होता दीप सिद्धू?
दीप सिद्धू हा पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्याचा रहिवासी होता. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने किंगफिशर मॉडेल हंट अवॉर्ड जिंकला होता. त्यानंतर त्याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. 2015 मध्ये त्याचा पहिला सिनेमा ‘रमता जोगी’ रिलीज झाला. मात्र सिद्धूला 2018 मधील ‘जोरा दास नम्ब्रिया’ या पंजाबी चित्रपटातून मोठी ओळख मिळाली.