Cannes Film Festival : यंदाचा कान फिल्म फेस्टिवल भारतासाठी खूप खास राहिला. १४ ते २५ मेदरम्यान पार पडलेल्या या कान फिल्म फेस्टिवलमध्ये अनेक भारतीय कलाकारांनी प्रमुख पारितोषिके जिंकली आणि त्यांच्या कामांसाठी समीक्षकांनीही त्यांची प्रशंसा केली. मोठ्या स्टार्सशिवाय, सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर्स, भोजपुरी स्टार्स आणि टीव्ही सेलेब्सदेखील कान्समध्ये पाहायला मिळाले. सध्या सगळीकडे कान्सचीच चर्चा सुरू आहे. यातच अभिनेते दीपिक तिजोरी यांनी एका मुलाखतीदरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटचं रहस्य उघड केलं आहे.
इन्स्टंट बॉलिवूडशी बोलताना दीपक तिजोरी यांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. कान्समध्ये एक खरे आणि एक नकली कार्पेट असतं, असा दावा त्यांनी केला. दीपक तिजोरी म्हणाले, 'कान्समध्ये माझी पहिलीच वेळ होती, मी अनेक वर्षांपासून कान्स पाहत आलो आहे. तिथलं वातावरण खूप वेगळं आहे. कान्सबद्दल आपल्याकडे खूप बोललं जातं. पण, पण वास्तव काही वेगळेच आहे'.
दीपक तिजोरी पुढे म्हणाले, 'मला खरंच आश्चर्य वाटलं. तिथे असं एक नकली रेड कार्पेट आहे. त्यावर तुम्हाला पाहिजे तितके फोटो तुम्ही घेऊ शकता. तर एक मूळ रेड कार्पेट देखील आहे जिथे तुम्हाला पैसे भरावे लागतील". दीपक तिजोरी यांच्यापुर्वी संभावना सेठ यांनीदेखील कान्समधीर रेड कार्पेटवर भाष्य केलं होतं. पैसे दिल्यास कान्समध्ये स्क्रीनिंग करता येते. तसेच पैसे देऊन स्वतःसाठी रेड कार्पेट टाकला जातो, असेही त्यांनी म्हटलं.
कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपटांचे येथे स्क्रीनिंग होतं. चित्रपटांव्यतिरिक्त हा महोत्सव दरवर्षी उपस्थितांच्या फॅशनने सातत्याने लक्ष वेधून घेतो. वर्षानुवर्षे भारतीय कलाकारही या महोत्सवात उपस्थिती दर्शवत आले आहेत. प्रत्येक कान फिल्म फेस्टिवलमध्ये भारतीय कलाकारांचे पोशाख चर्चेचा विषय ठरतात.