१० जानेवारीला बॉक्स ऑफिसवर दोन मोठे सिनेमे एकत्र प्रदर्शित झाले. दीपिका पदुकोणचा 'छपाक' व अजय देवगणचा 'तान्हाजी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर येऊन धडकले. आतापर्यंत या दोन्ही चित्रपटांचे कलेक्शन पाहिले तर दोन्ही सिनेमे प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणण्यात यशस्वी ठरत आहेत.
बॉक्स ऑफिस इंडिया वेबसाइटनुसार, 'छपाक'ने पाचव्या दिवशी दोन ते सव्वा दोन कोटींचे कलेक्शन केलं आहे. चित्रपटाने शुक्रवारी ४.७७ कोटी, शनिवारी ६.९० कोटी व रविवारी ७.३५ कोटी आणि सोमवारी २.३५ कोटींची कमाई केली आहे. याप्रकारे चित्रपटाने पाचव्या दिवशी जवळपास २३.५० कोटींची कमाई केली आहे.
मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' चित्रपटात दीपिका पदुकोणसोबत विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारीत आहे.या चित्रपटाचं प्रमोशन व खर्च पकडून या चित्रपटाचं एकूण बजेट ४५ कोटी आहे. चित्रपट हिट होण्यासाठी ६० कोटींची कमाई करावी लागेल. छपाकला एकूण २,१६० स्क्रीन्स मिळाले आहेत. भारतात १७०० स्क्रीन्स व परदेशात ४६० स्क्रीन्सचा समावेश आहे.
'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' चित्रपटाने पाचव्या दिवशीदेखील आपली जादू कायम ठेवली आहे. तान्हाजीने सोमवारच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये २० टक्के कमाई केली आहे. मंगळवारी १६ कोटींचं कलेक्शन केलं आहे. अशाप्रकारे पाचव्या दिवशी या चित्रपटाने जवळपास ९१.५० कोटींची कमाई केली आहे.
अजय देवगण, सैफ अली खान व काजोल यांची मुख्य भूमिका असलेला तानाजी चित्रपट ब्लॉकबस्टर ठरण्याच्या मार्गावर आहे. चित्रपटाचे बजेट ११० कोटी आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन व प्रिंट्सवर १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत चित्रपटाचा एकूण बजेट १२५ कोटींचा आहे. अशाप्रकारे चित्रपट हिट होण्यासाठी कमीत कमी १५० कोटी रुपये कमवावे लागतील.