बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग आज विवाह बंधनात अडकणार आहेत. या दोघांचे लग्न इटलीत होत असून या दोघांच्याच लग्नाची सगळीकडे चर्चा आहे. दीपिकाने ओम शांती ओम या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील करियरला सुरुवात केली. तिच्या पहिल्याच चित्रपटात तिला शाहरुख खानसोबत झळकण्याची संधी मिळाली. आज तिने तिच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये तिचे एक स्थान निर्माण केले आहे.
दीपिकाला बॉलिवूडमधील सगळ्यात सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानले जाते. तिच्या सौंदर्यावर, तिच्या अदांवर तिचे अनेक फॅन्स फिदा आहेत. दीपिका आजच नव्हे तर तिच्या लहानपणापासून खूप सुंदर दिसते. तिने तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर तिचा लहानपणीचा एक फोटो काही महिन्यांपूर्वी शेअर केला होता. या फोटोत तिच्यासोबत तिची बहीण दिसत होती. या फोटोत ती आणि तिची बहीण अनिशा एका गार्डनमध्ये बसलेली असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तसेच, दोघांच्याही हेअर कट मध्ये साम्य असून त्या खूपच सुंदर दिसत आहेत. बॉलिवूडमध्ये दीपिकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर यश प्राप्त केले आहे. ओम शांती ओम या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर दीपिकाने मागे वळून पाहिलेच नाही. विशेष म्हणजे तिने हॉलिवूडमध्ये सुद्धा एंट्री केली आहे. हॉलिवूड अॅक्शन स्टार विन डिजेल याच्यासोबत ट्रिपल एक्स : द रिर्टन ऑफ झेंडर केज या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली.
रणवीर व दीपिका संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला-रामलीला चित्रपटाच्या शूटींगदरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. तेव्हापासून या कपलच्या लव्हलाईफची चर्चा होती. अर्थात दीपिका व रणवीर दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे त्यांच्यातील नाते मीडियासमोर मान्य केलेले नव्हते. त्यानंतर त्या दोघांनी बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. अनेक वर्षांच्या अफेअरनंतर ते दोघे लग्न करत असून त्यांच्या लग्नाला केवळ त्यांचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रीण उपस्थित आहेत.