मार्व्हल सिने विश्वातील नव्या चित्रपटाचा टीझर-ट्रेलर प्रसिद्ध झाला आहे. ‘द मार्व्हल्स’ (The Marvels) चित्रपटाच्या या टीझर ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून अवघ्या 6 दिवसांत या ट्रेलरला युट्युबवर 1.7 कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या चित्रपटात 3 मार्व्हल्स दिसणार आहेत.यातील कॅप्टन मार्व्हलच्या भूमिकेत ब्री लार्सन दिसणार आहे, मिस मार्व्हलच्या भूमिकेत इमान वेल्लानी दिसेल तर मोनिका रँम्ब्यूच्या भूमिकेत टिओना पॅरीस दिसणार आहे. हा चित्रपट मार्व्हल सिनेविश्वातील इतर चित्रपटांप्रमाणेच धमाकेदार असणार याची प्रेक्षकांच्या मनात तीळमात्र शंका नाहीये. थोडा हटके विचार करून बघूया, जर हाच चित्रपट बॉलीवूडमध्ये बनला असता तर या कॅप्टन मार्व्हल, मिस मार्व्हल आणि मोनिका रॅम्ब्यूच्या भूमिकेत कोणत्या भारतीय अभिनेत्री शोभून दिसल्या असत्या? यावर लोकांनी आपली डोकॅलिटीची गाडी सुसाट फिरवत काही नावं सुचवली आहेत. ती नावे कोणती आहे ते पाहूयात. कॅप्टन मार्व्हलच्या भूमिकेत दीपिका पादुकोण
जिच्यावर लाखो तरूण आजही जीव ओवाळून टाकतात अशी लाखांत एक देखणी दीपिका पादुकोण ही अभिनयात जितकी भारी आहे तितकीच ती मारधाडीच्या म्हणजेच अॅक्शन दृश्यांमध्ये कमाल दिसते. दीपिका हिने एका कार्यक्रमात बोलताना मार्व्हल सिनेमॅटीक युनिव्हर्स म्हणजेच एमसीयूचा एक भाग बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिने या कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की,भारतीय मातीत जन्माला आलेला सुपरहिरो बघण्यासाठी दुनिया सज्ज आहे. मला खात्री आहे की हा दिवस नक्की येईल. मिस मार्व्हलच्या भूमिकेत अवनीत कौर
मिस मार्व्हलची भूमिका साकारणाऱ्या इमान वेल्लानीच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अर्थात तिने ज्या पद्धतीने काम केलं आहे ते पाहाता हे कौतुक होणं स्वाभाविकच आहे. जर तिची ही भूमिका भारतामधील अभिनेत्रींना द्यायचं ठरवलं तर अनवीत कौर या भूमिकेसाठी एकदम योग्य निवड असू शकेल. मोनिका रॅम्ब्यूच्या भूमिकेसाठी राधिका आपटे
धाडसी, बिनधास्त आणि बेदरकारपणे जगणाऱ्या मोनिका रॅम्ब्यूच्या भूमिकेसाठी राधिका आपटे हे नाव एकदम फिट्ट बसतं. राधिकाने आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. भूमिका कोणत्याही धाटणीची असो; गंभीर, विनोदी, थरारक किंवा मारधाडीची राधिका आपल्या नैसर्गिक अभिनयामुळे कोणत्याही भूमिकेसाठी चपखल निवड वाटते. चाकोरीबाहेरचं करण्याचा किंवा चौकट मोडण्याचा प्रयत्न करण्याच्या तिच्या स्वभावामुळे ती मोनिया रॅम्ब्यूच्या भूमिकेसाठी उत्तम निवड ठरू शकते. विचार करा दीपिका पदुकोण, राधिका आपटे आणि अवनीत कौर या तिघी एका सुपरहिरो चित्रपटात एकत्र दिसल्या तर काय धमाल येईल.