अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा पारंपरिक कोंकणी पद्धतीने विवाह संपन्न झाला. इटलीतील लेक कोमो इथल्या नयनरम्य व्हिलामध्ये हा सोहळा पार पडला. त्यांच्या जवळच्या नातलगांच्या आणि मित्र मैत्रिणीच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडला. दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ ते स्वतःच त्यांच्या फॅन्ससाठी शेअर करणार असल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या दोन दिवसांपासून लग्नातल्या इतर विधींना सुरुवात झाली आणि मंगळवारी कोंकणी पद्धतीनेच दीप-वीरचा साखरपुडा झाला. लग्नाच्या पार्श्वभूमीवर लेक कोमो परिसरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था असून लग्नविधीचे फोटो किंवा व्हिडिओ अद्याप समोर आले नाहीत. मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत राजेशाही थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला. कोंकणी पद्धतीने विवाह संपन्न झाल्यानंतर उद्या सिंधी पद्धतीने दीपिका रणवीर विवाहबद्ध होणार आहेत. या सोहळ्यातील कोणतेही फोटो सोशल मीडियावर अपलोड न करण्याची अट रणवीर आणि दीपिकाने पाहुण्यांना ठेवली असल्याचे समजते आहे.
मंगळवारी दीप- वीरच्या संगीत समारंभासाठी गायिका हर्षदीप कौरला आमंत्रित करण्यात आले होते. हर्षदीपने एकाहून एक दमदार गाणी सादर करत या समारंभात चार चाँद लावले. दीपवीरने संगीत सोहळ्यात धम्माल मस्ती केली. रणवीर यावेळी फुल मूडमध्ये होता. त्याने दीपिकासाठी ‘गुंडे’मधील ‘तुने मारी एंट्री’ गायले. संगीत समारोहात सगळेच भारतीय पोशाखात होते. ‘मेहंदी है रचने वाली’, ‘काला शा काला’च्या स्वरांची धूम होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही सेरेमनीत रणवीरने प्रचंड एन्जॉय केले. मुंबईत परतल्यानंतर २८ नोव्हेंबर २०१८ ला सायंकाळी ८ वाजता रिसेप्शन होणार आहे.