बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचे नाव यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत दाखल झाले आहे. गेल्या वर्षी दीपिकाचा पद्मावत हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिने राणी पद्मावतीची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांना खूप भावली. या चित्रपटानंतर दीपिकाची डिमांड खूप वाढली आहे. मात्र तिने नुकताच एक सिनेमा सहकलाकारांपेक्षा कमी मानधन देत असल्यामुळे नाकारला आहे.
दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले की,' मला चित्रपटाची कथा खूपच आवडली. माझा चित्रपटाला होकारही होता मात्र अभिनेत्याच्या तुलनेत मला कमी मानधन दिल्यामुळे मी चित्रपट नाकारला. मला माझी किंमत ठाऊक आहे. कोणत्या चित्रपटासाठी किती मानधन घ्यायचे हे मला माहित आहे. माझा अभिनय, माझे काम या सर्वांची कल्पना मला आहे. त्यामुळे मी माझ्या कामाला अनुसरूनच मानधन मागते. मानधनाच्या बाबतीत कोणतीच तडजोड मी यापुढे करणार नाही. कोणाला किती मानधन दिले जाते याची कल्पना प्रत्येकाला असते मलाही आहे. एका चित्रपटाच्या निर्मितीसाठी किती खर्च येतो हेही मला ठाऊक आहे. त्यामुळे या सगळ्याचा विचार करूनच मी मानधन मागते. मात्र जर अभिनेत्याला जास्त मानधन द्यायचे आहे. म्हणून तुम्हाला कमी मानधन देतोय असे जर मला कोणी सांगितले तर मात्र मी हे खपवून घेणार नाही, तर मी मानधनाच्या बाबतीत कधीच तडजोड करणार नाही.'