'ओम शांती ओम' (om shanti om) या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण (deepika padukone). उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे चर्चेत येणारी दीपिका अनेकदा डिप्रेशन, नैराश्य यांसारख्या विषयावर सहजपणे व्यक्त झाली आहे. यामध्येच आता तिने मासिक पाळीवर भाष्य केलं आहे. जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाचं निमित्त साधत दीपिकाने तिच्या फर्स्ट पिरिअडचा अनुभव शेअर केला आहे.
सध्या सोशल मीडियावर दीपिकाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पीरिअड स्टोरीवर शेअर करण्यात आला असून यात तिने तिच्या मासिक पाळीचा अनुभव सांगत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.
काय म्हणाली दीपिका?
"माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीच्या आईने आम्हाला मासिक पाळीविषयी सांगितलं. मी, माझी मैत्रीण (दिव्या) आणि तिची आई एकत्र असताना त्यांनी पीरिअड्स म्हणजे काय हे सांगितलं. अगदी मासिक पाळी म्हणजे काय? त्यात काय होतं हे सारं त्यांनी आम्हाला सांगितलं. तो क्षण मी कधीही विसरु शकत नाही, " असं दीपिका म्हणाली. 'पीरियड स्टोरी'चा हा व्हिडीओ टेक ब्रँड Nua चा खास व्हिडिओ आहे.
दरम्यान, एका वृत्तानुसार, Nua चे संस्थापक आणि CEO रवी रामचंद्रन यांनी एका निवेदनातून जनतेला आवाहन केलं होतं. ज्यात ''अशा गोष्टी सांगा ज्यामुळे मुले वा मुली यांचा आपल्या पालकांशी संवाद वाढेल. ज्याविषयावर मुलं पालकांसोबत बोलू शकत नाही त्यावर ते बोलू शकतील. त्यांच्या या आवाहनानंतर दीपिकाचा हा खास व्हिडीओ समोर आला.