बापलेकीचं नातं हे वेगळं असतं. प्रत्येक पित्याचा आपल्या लेकीवर जीव असतो आणि लेकीचंही वडिलांवर तितकंच प्रेम होतं. त्यामुळे वडिलांचं नाव उंचावण्याची आणि त्यांना अभिमान वाटावं असं काम करण्याची लेकीची इच्छा असते. दीपिका पादुकोण आणि तिचे वडील प्रकाश पादुकोण यांचंही असंच काहीसं नातं आहे. बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची लेक असलेल्या दीपिकाला वडिलांचं नाव उंचावण्याची इच्छा आहे. वडिलांप्रमाणे ती बॅडमिंटन खेळत नसली तरी आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत दीपिका आघाडीची नायिका बनली आहे.
नुकतंच एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये दीपिकाला खेळासंदर्भातील बायोपिकबाबत प्रश्न विचारण्यात आला. कोणत्या खेळाडूवर बायोपिक काढावा असा प्रश्न विचारताच दीपिकाने क्षणाचाही विलंब न लावता वडील प्रकाश पादुकोण यांचं नाव घेत त्यांच्यावर बायोपिक काढण्यात यावा असे सांगितले. इतकंच नाहीतर तिने या चित्रपटात काम करण्याची इच्छासुद्धा व्यक्त केली. दीपिका आणखी एका खेळासंदर्भातील चित्रपटात काम करत आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या १९८३ विश्वचषक विजयावर आधारित '८३' या चित्रपटात दीपिका महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. रणवीर सिंह हा या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारत असून दीपिका कपिल यांची पत्नी रोमी यांच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय दीपिका सध्या अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित 'छपाक' चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत असून दीपिकासह या चित्रपटात विक्रांत मेसी देखील झळकणार आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.