दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग आज इटलीत लग्न करत असल्याची सगळ्यांना कल्पना आहे. त्यांनी आज इटलीतील लेक कोमो परिसरात कोंकणी पद्धतीने विवाह केला. त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाहीये. ते लवकरच लग्नाची घोषणा करणार असल्याचे म्हटले जात आहे.
रणवीर आणि दीपिकाने केवळ त्यांच्या जवळच्या नातलगांच्या आणि मित्र मैत्रिणीच्या उपस्थितीत लग्न केलं. हे लग्न अतिशय थाटामाटात झाले असून या लग्नाला प्रचंड सुरक्षा ठेवण्यात आली होती. लग्नातील कोणत्याही पाहुण्याला लग्न विधी अथवा लग्न परिसरातील कोणताही फोटो अथवा व्हिडिओ काढण्याची परवानगी नव्हती. दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ ते स्वतःच त्यांच्या फॅन्ससाठी शेअर करणार असल्याचे म्हटले जात आहे.
नुकतेच द वेडिंग ब्रिगेड, व्हायरलभयानी या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करण्यात आले आहे. हे सगळे फोटो खूपच दूरून काढण्यात आलेले असल्याने कोणत्याच फोटो मध्ये आपल्याला रणवीर आणि दीपिकाला पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे हा फोटो पाहून त्यांच्या फॅन्सची निराशा होणार यात काहीच शंका नाही.
गेल्या दोन दिवसांपासून लग्नातल्या इतर विधींना सुरुवात झाली आणि मंगळवारी कोंकणी पद्धतीनेच दीप-वीरचा साखरपुडा झाला. लग्नाच्या पार्श्वभूमीवर लेक कोमो परिसरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था असून लग्नविधीचे फोटो किंवा व्हिडिओ अद्याप समोर आले नाहीत. मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत राजेशाही थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला.
कोंकणी पद्धतीने विवाह संपन्न झाल्यानंतर उद्या सिंधी पद्धतीने दीपिका रणवीर विवाहबद्ध होणार आहेत. या सोहळ्यातील कोणतेही फोटो सोशल मीडियावर अपलोड न करण्याची अट रणवीर आणि दीपिकाने पाहुण्यांना ठेवली असल्याचे समजते आहे.
मंगळवारी दीप- वीरच्या संगीत समारंभासाठी गायिका हर्षदीप कौरला आमंत्रित करण्यात आले होते. हर्षदीपने एकाहून एक दमदार गाणी सादर करत या समारंभात चार चाँद लावले. दीपवीरने संगीत सोहळ्यात धम्माल मस्ती केली. रणवीर यावेळी फुल मूडमध्ये होता. त्याने दीपिकासाठी ‘गुंडे’मधील ‘तुने मारी एंट्री’ गायले. संगीत समारोहात सगळेच भारतीय पोशाखात होते. ‘मेहंदी है रचने वाली’, ‘काला शा काला’च्या स्वरांची धूम होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही सेरेमनीत रणवीरने प्रचंड एन्जॉय केले. मुंबईत परतल्यानंतर २८ नोव्हेंबर २०१८ ला सायंकाळी ८ वाजता रिसेप्शन होणार आहे.