दीपिका पादुकोण व रणवीर सिंग हे नवदाम्पत्य मुंबईला परतले. होय, १४ व १५ नोव्हेंबरला इटलीत लग्नगाठ बांधल्यानंतर दीपवीर मुंबईला दाखल झालेत. यावेळी सगळ्यांच्याच नजरा दीपवीरवर खिळल्या होत्या. मुंबई विमानतळावरून दोघेही थेट रणवीरच्या घराकडे रवाना झाले. बांद्रातील रणवीरच्या घरी दीपिकाचा गृहप्रवेश होणार आहे.
लग्नाचा एकही फोटो लीक होऊ नये, यासाठी दीपवीर दोघांनीही सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या सुरक्षेवर सुमारे १ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला होता. अर्थात याऊपरही काही फोटो लीक झाले होते. पण हे फोटो अस्पष्ट होते. कारण हे फोटो ब-याच दूर अंतरावरून टिपण्यात आले होते. लग्नानंतर दीपवीर भारतात तीन रिसेप्शन देणार आहेत. होय, येत्या २१ नोव्हेंबरला बेंगळुरू येथे दीपवीरच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन होईल. दीपिकाचे आई-वडिल हे रिसेप्शन होस्ट करतील. यानंतर येत्या २८ नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला मुंबईच्या ग्रण्ड हयात हॉटेलमध्ये दुसरे व तिसरे रिसेप्शन होणार आहे. २८ तारखेच्या रिसेप्शला केवळ मित्र आणि कुटुंबीय असतील. तर १ डिसेंबरचे रिसेप्शन केवळ बॉलिवूडमधील मित्रपरिवारासाठी असेल.