दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या फोटोकडे अनेक जण डोळे लावून बसले आहेत. तूर्तास या फोटोसाठी आपल्याला आणखी काही तास प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण तोपर्यंत दीपिकाच्या बेंगळुरुस्थित घरी झालेल्या नंदीपूजेचे फोटो मात्र आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. होय, लग्नापूर्वी दीपिकाच्या घरी नंदीपूजेचे आयोजन केले गेले होते.
या पूजेवेळचा एक फोटो सध्या वेगाने व्हायरल होतोय. या फोटोत दीपिका, दीपिकाचे आई-वडिल आणि बहीण असे चौघेही पारंपरिक पोशाखात आहेत. नंदीपूजेद्वारे सर्वप्रथम देवाला लग्नाचे आमंत्रण दिले जाते.सुप्रसिद्ध नंदी मंदिरातील ब्राह्मणांच्या हस्ते ही पूजा केली जाते. या पूजेत भावी वधूला काचेचा चुडा चढवला जातो. त्यानुसार, दीपिकालाही काचेचा चुडा चढवला गेला. लग्न होईपर्यंत वधूने हा काचेचा चुडा हातातून काढायचा नसतो.
दीपिका पादुकोण व रणवीर सिंग दोघेही काल १४ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकले. काल दोघांनीही कोंकणी पद्धतीने विवाह केला. आज हे जोडपे सिंधी पद्धतीने विवाहबद्ध होत आहेत. दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतूर आहेत. दोघांनीही अद्याप एकही फोटो शेअर केला नसल्याने चाहते नाराज आहे. टिष्ट्वटरवर अनेकांनी आपली ही नाराजी व्यक्त केली आहे. तूर्तास ताज्या बातमीनुसार, दीपवीरच्या चाहत्यांना आणखी काही तास या नवदांम्पत्याच्या पहिल्या फोटोची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी ६ नंतर दीपिका व रणवीर दोघेही आपल्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करतील. दोघेही स्वत: हे फोटो शेअर करणार आहेत. सिंधी पद्धतीच्या विवाहानंतर आपला आनंद ते स्वत: चाहत्यांसोबत शेअर करू इच्छितात. सर्वप्रथम आज दोघांचा ‘आनंद कराज’ विधी संपन्न होणार आहे. यानंतर सिंधी पद्धतीने विवाह होणार आहे.