चंदा कोचर यांच्या ‘बायोपिक’च्या प्रदर्शनावर बंदी, काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 02:29 PM2019-11-24T14:29:17+5:302019-11-24T14:29:36+5:30
Chanda: A Signature that Ruined a Career असे या चित्रपटाचे नाव आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनावर दिल्ली हायकोर्टाने शनिवारी बंदी घातली. चंदा कोचर यांचे वकील विजय अग्रवाल आणि नमन जोशी यांनी संबंधित चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी लादण्याची मागणी केली होती. हा चित्रपट चंदा कोचर यांचा बायोपिक आहे. चित्रपटाची कथा चंदा कोचर यांच्या आयुष्यावर आधारित आहे, असा दावा या वकीलांनी आपल्या याचिकेत केला होता.
Chanda: A Signature that Ruined a Career असे या चित्रपटाचे नाव आहे. अद्याप सीबीआय व ईडी चंदा कोचर यांची चौकशी करत आहेत, या पार्श्वभूमीवर संबंधित चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात विजय अग्रवाल यांनी सांगितले की, 20 नोव्हेंबर 2019 रोजी चंदा कोचर यांना हा चित्रपट त्यांच्या आयुष्यावर आधारित असल्याचे समजले. चित्रपटाच्या शीर्षकातही त्यांच्या नावाचा उल्लेख आहे. या चित्रपटासंदर्भात चंदा कोचर यांची कुठलीही पूर्वपरवानगी घेतली गेली नव्हती.
या चित्रपटाची लीड हिरोईन ही सुद्धा प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना चंदा कोचर यांच्या आयुष्यावर उघडउघड बोलतेय. याप्रकारचे बायोपिक आणि प्रमोशनल इंटरव्ह्यू चुकीचे आहे. यामुळे चौकशी प्रभावित होण्याची शक्यता आहे.
वकीलांच्या या युक्तिवादानंतर हायकोर्टाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी लादली. या चित्रपटात अभिनेत्री गुरलीन चोप्रा हिने चंदा कोचर यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.