देओल कुटुंब हे बी-टाऊनमधील सर्वात लोकप्रिय कुटुंब आहे. धर्मेंद्रपासून ते सनी देओल आणि बॉबी देओलपर्यंत तर हेमा मालिनीपासून ते ईशा देओलपर्यंत सर्वच जण फिल्मी दुनियेत सक्रीय आहेत. धर्मेंद्र यांचे भाऊ अजित देओल हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते होते. धर्मेंद्र आणि अजित देओल यांच्यानंतर त्यांच्या मुलांनीही बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलं. यात काही स्टार किड्स यशस्वी झाले असले तरी काही फ्लॉप ठरले.
असाच एक देओल घराण्यातील एक स्टार किड आहे. ज्यानं आपल्या 19 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत एकही सोलो हिट चित्रपट दिलेला नाही. पण एवढे करूनही त्याच्याकडे पैसा आणि मालमत्तेची कमतरता नाही. हे स्टारकिड्स सनी देओल किंवा बॉबी देओल नाही. तर तो स्टार किड हा अभय देओल आहे. अभय देओलनं 2005 मध्ये इम्तियाज अलीच्या 'सोचा ना था' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
अभय देओल हा दिवंगत अभिनेते अजित देओल यांचा मुलगा आणि धर्मेंद्र यांचा पुतण्या आहे. अभय देओलची फिल्मी कारकीर्द ही त्याचे चुलत भाऊ सनी देओल आणि बॉबी देओल यांच्याइतकी यशस्वी ठरली नाही. बॉलिवूडमध्ये त्याला 19 वर्षे झाली असून या काळात त्याने 13 फ्लॉप चित्रपट दिले आहेत. फ्लॉप फिल्मी करिअर असूनही अभय देओलकडे पैशांची कमतरता नाही. डीएनएच्यार रिपोर्टनुसार, अभय देओलची एकूण संपत्ती 400 कोटी रुपये आहे.
अभिनेत्याकडे घर, कार आणि चांगला बँक बॅलन्स आहे. पण प्रश्न असा आहे की अभय देओलचे चित्रपट चांगले चालत नसताना त्यांच्याकडे एवढी संपत्ती कशी? अभय देओल त्याच्या चित्रपटांसाठी ३ कोटी रुपये फी घेतो. तर ब्रँड एंडोर्समेंटसाठी 25 लाख रुपये घेतो आणि सोशल मीडिया पोस्टसाठी लाखो रुपये घेतो. त्याचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे आणि द फॅटी काउ नावाचे रेस्टॉरंट देखील आहे.
अभय देओलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'बन टिक्की' या चित्रपटात दिसणार आहे. मनीष मल्होत्राच्या प्रॉडक्शन हाऊस स्टेज 5 प्रॉडक्शन अंतर्गत बनत असलेल्या या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन फराज आरिफ करत आहेत. शबाना आझमी आणि झीनत अमान देखील या चित्रपटाचा भाग आहेत.