‘सिर्फ तुम’ या सिनेमातील ‘इक मुलाकात जरूरी है सनम’ आणि ‘हिना’ सिनेमातील ‘देर ना हो जाऐ’ अशी सुपरहिट गाणारे जयपूरचे कव्वाली गायक फरीद साबरी (Farid Sabri) यांचे बुधवारी निधन झाले.मंगळवारी रात्री उशीरा त्यांची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर त्यांना एका खासगी रूग्णालयात भरती करण्यात आले. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. प्राप्त माहितीनुसार, फरीद साबरी यांना न्युमोनिया झाला होता. यामुळेच त्यांचा मृत्यू झाला. आज दुपारी त्यांचा दफनविधी पार पडला.
फरीद साबरी व त्याचे बंधू अमीन साबरी हे ‘साबरी ब्रदर्स’ (Sabri brothers) या नावाने लोकप्रिय होते. जयपूरच्या रामगंज भागातील चौकडी गंगापोल जन्मलेल्या फरीद साबरी यांनी पिता सईद साबरी व लता मंगेशकर यांच्यासोबत मिळून ‘हिना’तील ‘देर ना हो जाए कहीं देर न हो जाए’ हे गाणे गायले होते. साबरी ब्रदर्स देशातच नव्हे तर जगभर लोकप्रिय होते. या जोडीने जगभर कव्वालीचे शो केलेत. पण आज फरीद साबरी यांच्या निधनाने साबरी ब्रदर्सची जोडी कायमची दुभंगली.