नीलम कोठारीने नव्वदीच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिचे खुदगर्ज, हत्या, आग ही आग, खतरों के खिलाडी यांसारखे अनेक चित्रपट गाजले होते. त्या काळात नीलम प्रेक्षकांची प्रचंड लाडकी अभिनेत्री होती. गोविंदा, चंकी पांडे यांच्यासोबत तर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. गोविंदासोबतची तिची जोडी तर चांगलीच गाजली होती. पण तुम्हाला माहीत आहे का गोविंदा नीलमच्या प्रेमात वेडा झाला होता.
गोविंदाचे लग्न सुनीतासोबत ११ मार्च १९८७ ला झाले होते. सुनीता आणि गोविंदा यांनी अनेक वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले होते. पण लग्न व्हायच्या काही वर्षं आधी गोविंदा नीलमच्या प्रेमात पडला होता. नीलमला पाहाताच क्षणी त्याला ती प्रचंड आवडली होती. स्टारडस्टरला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने या गोष्टीची कबुली देखील दिली होती. नीलमचे शिक्षण बाहेरगावी झाल्यानंतर ती करियरसाठी मुंबईत आली होती. गोविंदा आणि तिची भेट कुठे झाली होती हे देखील त्याच्या लक्षात आहे. त्याने त्या मुलाखतीत सांगितले होते की, मी प्रणल मेहताच्या ऑफिसमध्ये नीलमला सगळ्याच पहिल्यांदा पाहिले होते. तिने पांढऱ्या रंगाची शॉर्टस घातली होती. तिचे काळेभोर मोठे केस पाहून ही कोणती तरी परीच आहे असे मला वाटले होते. तिने मला हॅलो बोलल्यानंतर पुढे तिच्याशी काहीही बोलायला मी घाबरत होतो. कारण माझे इंग्रजी चांगले नव्हते. मी तिच्याशी सेटवर कसा बोलणार हा मला प्रश्न पडला होता. आम्ही दोघेही वेगवेगळ्या बँकराऊंडमधून आलेलो असलो तरी काहीच दिवसांत आमची खूप चांगली गट्टी जमली.
आम्ही त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. ती इतकी सुंदर मुलगी होती की, कोणीही तिला पाहून तिच्या प्रेमात पडेल. नीलमला प्रचंड प्रसिद्धी मिळूनही तिचे पाय जमिनीवरच होते. तिच्यासारखी प्रेयसी प्रत्येकाला मिळावी अशीच प्रत्येक मुलाची इच्छा असेल. त्यामुळे मी सुनीताला तिच्यासारखे बनण्याचे सांगत असे आणि त्यावर ती चिडत असे. एकदा तर सुनीता नीलमच्या बाबतीत काही वाईट गोष्ट बोलली असल्याने आमच्यात वाद झाला होता. मी आमचा साखरपुडा देखील मोडला होता. पण काहीच दिवसांत सुनीता पुन्हा माझ्या आयुष्यात परत आली. मला नीलमसोबत लग्न करायचे होते आणि त्यात काही चुकीचे होते असे मला वाटत नाही. नीलमसोबत मी लग्न करावे अशी माझ्या वडिलांची पण इच्छा होती. पण सुनीताला मी कमिटमेंट दिली होती. त्यामुळे मी सुनीताशीच लग्न करावे असे माझ्या आईला वाटत होते. माझी आई माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असल्याने मी सुनीतासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
नीलमला मी लग्नासाठी विचारल्यावर ती हसायची. तिला त्याकाळात करियर अधिक महत्त्वाचे होते आणि त्यातही तिला अतिशय हुशार आणि दिसायला सुंदर असलेल्या मुलासोबत लग्न करायचे होते आणि मी यापेक्षा खूपच वेगळा होतो आणि त्यामुळे मी सुनीतासोबत लग्न करण्याचा विचार केला. सुनीता आणि मी घरातील अगदी जवळच्या लोकांच्या उपस्थितीत मंदिरात लग्न केले होते. हे लग्न आम्ही सगळ्यांपासून वर्षभर लपवले होते. नीलमला देखील याविषयी माहीत नव्हते. लग्नानंतर देखील मला नीलम तितकीच आवडत होती. तिला दुसऱ्या अभिनेत्यांसोबत काम करताना पाहायला मला आवडायचे नाही.