नीरू बाजवा हे पंजाबी चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहे. पंजाबी चित्रपटांत यशाच्या शिखरावर असताना अनेकांप्रमाणे तिलाही बॉलिवूड खुणावू लागले आणि नीरूने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण बॉलिवूडमधील एका घटनेनंतर मात्र तिने या इंडस्ट्रीत कधीही काम न करण्याची शपथ घेतली. आज (26 ऑगस्ट)नीरू बाजवा हिचा वाढदिवस. त्यानिमित्त जाणून घेऊ या हा किस्सा....
1998 मध्ये नीरूने बॉलिवूड चित्रपट साईन केला. होय, देव आनंद यांच्या ‘मैं सोलह बरस की’ या चित्रपटातून तिचा डेब्यू झाला. पण या एका चित्रपटानंतर तिने बॉलिवूडमध्ये काम करणे बंद केले. पुढे अनेक वर्षांनंतर यामागचे कारण नीरूने सांगितले. यामागचे कारण होते नीरूला बॉलिवूडमध्ये आलेले वाईट अनुभव.
एका मुलाखतीत नीरू यावर बोलली होती. ‘मी कुणाचे नाव घेणार नाही. पण हिंदी चित्रपटासंदर्भात होणाºया मीटिंगदरम्यान मला खूप अश्लील अनुभव आलेत. बॉलिवूडमध्ये टिकायचे तर हे करावेच लागेल, असे मला अनेकांनी सांगितले. हे ऐकून मी हादरले. बॉलिवूड इंडस्ट्रीत असेच काम चालते, असा दावा मी करणार नाही. पण तसे कटू अनुभव भोगणारी मी एक दुर्दैवी अभिनेत्री आहे. या अनुभवानंतर मी बॉलिवूडमध्ये कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला, ’असे नीरूने सांगितले होते.
नीरूने अनेक पंजाबी चित्रपटांत काम केले. मेल करा दे रब्बा, जिन्हें मेरा दिल लुटेया अशा अनेक चित्रपटात ती झळकली. अगदी अलीकडे ती ‘शडा’ या पंजाबी चित्रपटात दिसली होती. यात दिलजीत दोसांज मुख्य भूमिकेत होता.