वयाच्या 23 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारे आणि पुढे अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते देव आनंद यांचा आज वाढदिवस (Birth Anniversary). पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये 26 सप्टेंबर 1923 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. देव आनंद आज आपल्यात नाहीत. (3 डिसेंबर 2011 रोजी लंडनमध्ये या सदाबहार अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला होता.) पण या सदाबहार अभिनेत्याला विसरणे शक्य नाही.आज देव आनंद यांच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या ‘काला बाजार’ या सिनेमाच्या सेटवरचा एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. देव आनंद आणि वहिदा रहमान यात मुख्य भूमिकेत होते. वहिदा आणि देव आनंद यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले होते. पण 1960 साली आलेल्या ‘काला बाजार’ या चित्रपटाच्या शूटींगवेळी वहिदा यांना असे काही करावे लागले होते की, त्यांना आजही त्याचा पश्चाताप होता.
होय,‘काला बाजार’च्या एका सीनमध्ये वहीदा व देव आनंद पहाडावर फिरायला जातात. याचदरम्यान देव आनंद यांचा तोल जातो आणि ते खाली लटकू लागतात. अशा कठीण परिस्थितीत वहिदा आपल्या अंगावरची साडी सोडून त्या साडीच्या आधाराने देव आनंद यांना वर खेचतात, असा हा सीन होता. दिग्दर्शकाने हा सीन समजावून सांगितला आणि तो ऐकताच वहिदांनी हा सीन करण्यास स्पष्ट नकार दिला. इतकेच नाही चित्रपट सोडण्याची धमकीही दिली.
दिग्दर्शकाच्या मते, वहिदांनी आपल्या साडीने देव आनंद यांना वर खेचल्यास सीन अधिक जिवंत होईल. पण वहिदा काही केल्या हा सीन करायला तयार नव्हत्या. अखेर देव आनंद यांनी वहिदा यांना एकांतात नेले आणि त्यांना समजावले. ‘मी सुद्धा असा काही सीन केला नसता. पण दिग्दर्शकासमोर मी अगतिक आहे. तू चित्रपट साईन करताना करारावरही स्वाक्षरी केली आहे. हा करार आमच्याकडे आहे. तू हा सीन देणार नसशील तर आम्हाला कायद्याची मदत घ्यावी लागेल,’ असे देव आनंद यांनी वहिदा यांना स्पष्ट शब्दांत सांगितले. तेव्हा कुठे वहिदा या सीनसाठी तयार झाल्या. पण हा सीन शूट करताना केवळ देव आनंद आणि मी राहिल, या अटीवर त्या तयार झाल्यात.