बॉलिवूडमध्ये स्टार किड्सला अगदी सहज काम मिळते, हे खरे असले तरी पूर्ण सत्य नाही. होय, एकेकाळचे दिग्गज दिग्दर्शक विजय आनंद यांचा मुलगा आणि सुपरस्टार देव आनंद यांचा पुतण्या वैभव आनंद याचे उदाहरण असेच. एक नाही, दोन नाही तर तब्बल 14 वर्षे स्ट्रगल केल्यानंतर वैभवला पहिला ब्रेक मिळाला आहे. एकता कपूरच्या ‘द वर्डिक्ट - नानावटी वर्सेस स्टेट’ या वेब सीरिजमध्ये वैभवची वर्णी लागली आहे. गत 30 सप्टेंबरला अल्ट बालाजीवर ही वेबसीरिज प्रसारित झाली. या वेब सीरिजसाठी मानधनापोटी वैभवला प्रतिदिन 18 हजार रूपये मिळाले.
वडिल विजय आनंद आणि काका देव आनंद यांच्या पावलावर पाऊल ठेवत वैभवने बॉलिवूडची वाट निवडली. गत 14 वर्षांत या इंडस्ट्रीत जम बसवण्याचे अनेक प्रयत्न त्याने केलेत. पण प्रत्येकवेळी त्याच्या पदरी निराशा पडली. 14 वर्षांत वैभवने 100 पेक्षा अधिक चित्रपटांसाठी ऑडिशन दिले. रवी चोप्रा व सूरज बडजात्या यांच्याकडे अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. काही थ्रीलर चित्रपटांची कथाही त्याने लिहिली. हे चित्रपट त्याला दिग्दर्शित करायचे होते. पण निर्मात्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला नाही. अखेर अनेक वर्षांनंतर वैभवला एकता कपूरच्या वेब सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या वेब सीरिजमध्ये वैभव मुख्य भूमिकेत नसला तरी ही संधी त्याला महत्त्वाची वाटते.