Devendra Fadnavis Reaction On Emergency: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित इमर्जन्सी (Kangana Ranaut Film Emergency)चित्रपटाचा प्रीमियर गुरुवारी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेर लावली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाबद्दल आणि इंदिरा गांधी यांच्यावर भाष्य केलं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi ) यांनी जून १९७५ ते १९७७ या काळात देशात आणीबाणी लावली होती. या कालखंडावर आधारित इमर्जन्सी चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणीबाणीचं एक काळा अध्याय म्हणून वर्णन केलं. फडणवीस म्हणाले की, "आणीबाणीचा कालखंड देशाच्या इतिहासातील काळ रात्र असून त्याची माहिती देशवासियांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. कारण, लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर लोकशाहीवर आलेल्या संकटाची माहिती नव्या पिढीला द्यायला हवी. त्याशिवाय जनतेला लोकशाहीची किंमत समजणार नाही. 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या माध्यमातून हाच प्रयत्न करण्यात येत आहे".
कंगनाचं फडणवीस यांनी कौतुक केलं. ते म्हणाले, "कंगना यांनी इंदिरा गांधींची भूमिका प्रभावीपणे साकारली आहे. हा चित्रपट केवळ आणीबाणीच्या काळ्या काळाला उजाळा देत नाही, तर १९७१ च्या युद्धाचे आणि माजी पंतप्रधानांच्या जीवनाचे चित्रण देखील करतो. जर देशात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जो इतिहास शिकवला पाहिजे, तो इतिहास या सिनेमात पाहायला मिळतोय.
देवेंद्र फडणवीस यांनी आणीबाणीच्या काळातील त्यांचा वैयक्तिक अनुभव शेअर करत आठवणी जागवल्या. ते म्हणाले, "आणीबाणीदरम्यान माझ्या वडीलांना दोन वर्ष तुरुंगात डांबण्यात आले होते. तेव्हा मी पाच वर्षांचा होतो, यादरम्यान मी वडिलांना कधी तुरुंगामध्ये किंवा न्यायालयामध्ये भेटायला जात असे. त्यावेळच्या सर्वच आठवणी आजही ताज्या आहेत".