Join us  

Video: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'पुष्पा' स्टाइल; भर कार्यक्रमात गायलं 'श्रीवल्ली' गाणं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 1:59 PM

Devendra fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

साऊथ स्टार अल्लू अर्जून (allu arjun) याचा तुफान गाजलेला सिनेमा म्हणजे 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise). २०२१ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने जवळपास सगळेच रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. उत्तम कथानकासह या सिनेमातलं प्रत्येक गाणंही बॉक्स ऑफिसवर हिट ठरलं. त्यामुळे आजही यातील गाणी प्रेक्षकांच्या ओठी ऐकायला येतात. विशेष म्हणजे या गाण्याची भुरळ चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पडली आहे. नुकतंच एका कार्यक्रमात त्यांनी सिनेमातील श्रीवल्ली हे गाजलेलं गाणं म्हटलं. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

'पुष्पा' या सिनेमातील 'सामे सामे' आणि 'श्रीवल्ली' ही दोन गाणी चांगलीच लोकप्रिय झाली. त्यातील श्रीवल्ली हे गाण जावेद अली याने गायलं आहे. विशेष म्हणजे हेच गाणं देवेंद्र फडणवीस यांनी जावेद अलीसमोर सादर केलं. जावेद अलीच्या एका फॅन पेजवर देवेंद्र फडणीस यांचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

अलिकडेच देवेंद्र फडणवीस एका खासगी कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात जावेद अलीदेखील होता. कार्यक्रम सुरु असताना जावेद अलीने त्याचं श्रीवल्ली हे गाणं गायला सुरुवात केली. गाणं म्हणत असतानाच त्याने त्याचा माईक देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वळवला. विशेष म्हणजे फडणवीस यांनीही जावेद अलीला साथ दिली. या गाण्यातील एक कडवं त्यांनी गायलं.

दरम्यान, हा व्हिडीओ नागपूरमधील उद्योजक प्यारे खान यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीतील असल्याचं म्हटलं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच नितीन गडकरी यांनी देखील तुझसे नाराज नहीं जिंदगी हे गाणं गायलं.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसअल्लू अर्जुनबॉलिवूडTollywoodनितीन गडकरी