बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधुरी दीक्षितने हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले आहे. माधुरी दीक्षितचा आजही मोठा चाहतावर्ग आहे. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर माधुरीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. उत्कृष्ट अभिनयाने तिने कधी 'मोहिनी' तर कधी चंद्रमुखीच्या भूमिकेत जीव ओतला.
अतुलनीय सौंदर्यासोबतच माधुरी दीक्षित एक अप्रतिम नृत्यांगना देखील आहे. '54व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया'मध्ये माधुरीला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोशल मीडियावर ही घोषणा केली आहे.
अनुराग ठाकूर यांनी लिहले की, 'माधुरी दीक्षितने 4 दशकांपासून आपल्या प्रतिभेने पडद्याची शोभा वाढवली आहे. 'निशा' पासून ते मनमोहक 'चंद्रमुखी' पर्यंत, भव्य 'बेगम पारा' पासून 'रज्जो' पर्यंत, तिच्या अष्टपैलुत्वाला मर्यादा नाही. आज 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिभावान आणि करिश्माई अभिनेत्री माधुरी दीक्षितला 'भारतीय चित्रपटातील योगदानासाठी विशेष सन्मान' हा पुरस्कार प्रदान करताना आनंद होत आहे'.
आजपासून गोव्यात इफ्फीला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा आशियातील सर्वात जुना तसेच भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. यंदाच्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत होते.