गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वापासून ते सोशल मीडियावर 'अतरंगी रे' (atrangi re) या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. आनंद एल. राय यांच्या या मल्टी सुपरस्टार चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष (dhanush) आणि सारा अली खान (sara ali khan) स्क्रीन शेअर करत आहेत. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. त्यामुळे हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सारा अली खानची निवड झाल्यानंतर धनुष थोडासा तिच्या कामाबाबत साशंक होता. अलिकडेच एका मुलाखतीत धनुषने या गोष्टीचा खुलासा केला आहे.
साराला कास्ट केल्यावर धनुषला आलं होतं टेन्शन?
अलिकडेच 'अतरंगी रे'च्या प्रमोशनसाठी सारा आणि धनुष यांनी दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी धनुषने साराबाबतचं त्याचं मत मांडलं. "खरं सांगायचं तर साराचं नाव ऐकल्यावर मला टेन्शन आलं होतं. कारण, तिला मिळालेला रोल मोठा आणि तितकाच कठीण होता. त्यामुळे तिने आतापर्यंत किती चित्रपटांमध्ये काम केलंय? असा प्रश्न मी आनंदजींना विचारला. त्यावर त्यांनी "२-३ चित्रपटांमध्ये तिने काम केलंय" असं सांगितलं. पण, "ती कामात परफेक्ट आहे", असं ते म्हणाले होते. मात्र, तरी त्यावेळी मला एकदम धस्स झालं होतं. म्हटलं ही नक्की ती ही भूमिका करु शकेल ना?"
पुढे तो म्हणाला, "त्यावेळी मला खूप टेन्शन आलं होतं. पण साराने काम करायला सुरुवात केल्यावर माझी खात्री पटली. या भूमिकेसाठी ती एकदम परफेक्ट आहे. आनंदजींनी नक्कीच सारामध्ये काही तरी पाहिलं असणार. सारा कायम नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असते. तिची शिकण्याची भूक मला विशेष आवडली."
दरम्यान, धनुष-साराचा 'अतरंगी रे' हा चित्रपट २४ डिसेंबरला Disney+ Hotstar प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात साराने एका बिहारी मुलीची भूमिका साकारली आहे. यात तिने अशा मुलीची भूमिका साकारली आहे ज्यात ती एकाच वेळी प्रियकर आणि नवरा या दोघांवर प्रेम करत असते.