धर्मेंद्र यांचा आज म्हणजेच 8 डिसेंबरला वाढदिवस असून बॉलिवूडमधील अतिशय महान अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. धर्मेंद्र यांचे फॅन फॉलॉविंग प्रचंड आहे. सगळ्याच वयोगटातील लोक त्यांचे चाहते असून त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. धर्मेंद्र एक चांगले अभिनेते असण्यासोबतच एक खूप चांगले व्यक्ती आहेत. त्यांच्या डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्त्वाचे नेहमीच कौतुक केले जाते.
धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांतील कोणीच फिल्म इंडस्ट्रीत नव्हते. तसेच या इंडस्ट्रीत त्यांचा कोणीही गॉडफादर देखील नव्हता. पण त्यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले. पंजाबच्या लुधियाना शहरातील नुसराली या गावी धरमसिंग देओल यांचा जन्म झाला. केवल किशनसिंग देओल आणि सत्वंत कौर हे त्यांचे आई-वडील. लुधियानाच्या गव्हर्नमेंट सिनिअर सेकंडरी स्कूल आणि फगवारा येथील रामग्रहीय कॉलेजमध्ये धर्मेंद्र यांनी शिक्षण घेतले. वयाच्या १८ व्या वर्षीच फिल्मफेअर’चा न्यू टॅलेंट अॅवॉर्ड त्यांनी मिळवला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
धर्मेंद्र यांनी दिग्दर्शक अर्जुन हिंगोरानी यांच्या १९६० मधील ‘दिल भी तेरा हम भी तेरे’या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या चित्रपटासाठी त्यांना केवळ ५१ रुपये इतके मानधन मिळाले होते. त्यांनी शोले, बंदिनी, चुपके चुपके, धर्मवीर यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.
यशाच्या उच्चशिखरावर असताना धर्मेंद्र यांच्या जीवनात बॉलीवूडची ‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनी यांचा प्रवेश झाला. त्या दोघांनी सीता और गीता, नया जमाना, तुम हसीन मैं जवान, शोले अशा अनेक चित्रपटांत एकत्र काम केले होते. त्या दोघांना इशा आणि अहाना या दोन मुली आहेत. अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न करण्याअगोदर धर्मेंद्र यांचे प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न झालेले होते. त्यांना सनी, बॉबी, अजीता आणि विजेता अशी मुले आहेत. यापैकी अजीता आणि विजेता चंदेरी दुनियेपासून नेहमीच दूर राहिल्या.