बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लेक ईशाचा संसार मोडला आहे. पती भरत तख्तानीपासून घटस्फोट घेत ईशा वेगळी झाली आहे. पण, लेकीच्या घटस्फोटामुळे धर्मेंद्र यांना धक्का बसला आहे. घटस्फोटाबाबत ईशा आणि भरतने पुन्हा विचार करण्याची गरज असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
बॉलिवूड लाइफने दिलेल्या वृत्तानुसार, ईशा देओल आणि भरत तख्तानीच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे धर्मेंद्र खूश नसल्याचं देओल कुटुंबीयांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं आहे. "कोणत्याची आईवडिलांना मुलांचा मोडलेला संसार बघायला आवडत नाही. धर्मेंद्रसुद्धा एक वडील आहेत. आणि आता त्यांचं दु:ख कोणीही समजू शकत नाही. ईशाने घेतलेल्या निर्णयाच्या ते विरोधात आहेत, असं नाही. पण, तिने याचा पुन्हा एकदा विचार करावा, असं त्यांचं म्हणणं आहे," अशी माहिती सूत्राने दिली आहे.
पुढे त्यांनी सांगितलं, "ईशा आणि भरत दोघेही धर्मेंद्र यांचा आदर करतात. भरत हा देओल कुटुंबाचा मुलगाच आहे. आणि ईशा तर लाडकी लेक आहे. त्यामुळे ते तिला नेहमी आनंदात पाहू इच्छितात. त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे धर्मेंद्र दु:खी आहेत. म्हणून दोघांनीही पुन्हा एकदा त्यांच्या निर्णायवर विचार करावा, असं त्यांना वाटतं. ईशा आणि भरत यांच्या मुली राध्या आणि मिरायादेखील त्यांच्या आजीआजोबांच्या खूप जवळच्या आहेत. त्यांच्या वेगळं होण्याच्या निर्णयाचा मुलींवर खूप मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे त्यांनी घटस्फोट घेण्याऐवजी संसार वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं त्यांना वाटतं."
ईशा आणि भरतने २०१२ साली विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर त्यांच्यात दुरावा आला होता. त्यांच्यात अनेक मतभेदही होती. त्यामुळे सुखी संसाराच्या १२ वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.