1980 साली प्रदर्शित झालेला ‘द बर्निंग ट्रेन’ हा मल्टिस्टारर सिनेमा तुम्हाला कदाचित आठवत असेल. धर्मेन्द्र, जितेन्द्र, हेमा मालिनी, नीतू सिंग, विनोद खन्ना, विनोद मेहरा, परवीन बाबी, डॅनी अशा दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा त्याकाळचा बिग बजेट सिनेमा होता. आता 80 च्या दशकातला हा सिनेमा एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. होय, 40 वर्षांनंतर या सिनेमाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.इत्तेफाक, पती पत्नी और वो यानंतर जॅकी भगनानी आणि जूनो चोप्रा यांनी ‘द बर्निंग ट्रेन’साठी हातमिळवणी केलीय. निर्माता या नात्याने या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालीय. लवकरच या सिनेमाच्या स्टारकास्टची घोषणा होणार आहे.
जॅकी भगनानी व जुनो चोप्रा यांनी याआधी इत्तेफाक व पती पत्नी और वो सारख्या क्लासिक चित्रपटांचे रिमेक बनवले आहेत. यापैकी इत्तेफाक फ्लॉप ठरला पण पती पत्नी और वो हिट ठरला होता. सध्या ‘द बर्निंग ट्रेन’च्या रिमेकच्या स्क्रिप्टवर काम सुुरु आहे.
‘द बर्निंग ट्रेन’ या चित्रपटाची कथा एका ट्रेन प्रवासाची कथा आहे. चालत्या ट्रेनला आग लागते आणि धर्मेन्द्र, विनोद खन्ना व जितेन्द्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत ट्रेनमधील प्रवाशांना वाचवतात, असे याचे कथानक आहे. हा चित्रपट त्याकाळचा बिग बजेट सिनेमा होता.
अर्थात बिग बजेट शिवाय एकापेक्षा एक दिग्गज कलाकार असूनही या सिनेमाने अपेक्षित यश मिळाले नव्हते. हा सिनेमा जपानी चित्रपट ‘द बुलेट ट्रेन’वर आधारित होता. रवी चोप्रा यांनी तो दिग्दर्शित केला होता तर बी. आर. चोप्रा याचे निर्माते होते.