धर्मेन्द्र,राजकुमार हिराणी यांना ‘राज कपूर’ तर विजय चव्हाण, मृणाल कुलकर्णी यांना ‘व्ही शांताराम’ पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2018 8:19 AM
राज्य शासनाच्या वतीने देणा-या येणा-या राज कपूर आणि चित्रपती व्ही शांताराम पुरस्कारांची घोषणा झालीय. ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्र यांना यंदाचा ...
राज्य शासनाच्या वतीने देणा-या येणा-या राज कपूर आणि चित्रपती व्ही शांताराम पुरस्कारांची घोषणा झालीय. ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्र यांना यंदाचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहिर झाला असून प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने गौरविले जाणार आहे. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारावरमराठी अभिनेते विजय चव्हाण यांनी आपले नाव कोरले असून चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हिला जाहीर झाला आहे. यंदाच्या ५५ व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. आज रविवारी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहिर झालेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्र यांनी सुमारे अडीचशेंवर चित्रपटात काम केले आहे. ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटाद्वारे धर्मेन्द्र यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आणि यानंतरच्या काळात अनेक हिट चित्रपट त्यांनी दिले. राज कपूर विशेष योगदान पुरस्कारासाठी निवड झालेले दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांची दिग्दर्शक, निर्माते, लेखक अशी ओळख आहे. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा हिराणींनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. त्यांच्या या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आणि यानंतर हिराणींनी कधीच मागे वळून पाहिले नाही. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’नंतर ‘लगे रहो मुन्ना भाई’ आणि ‘३ इडियट्स’ हे त्यांनी दिग्दर्शित केलेले दोन चित्रपटही प्रचंड गाजलेत.विजय चव्हाण यांच्याबद्दल ओळख करून देण्याची गरजचं नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी रसिकांना विजय चव्हाण या नावाने झपाटलेयं. ‘झपाटलेला’, ‘पछाडलेला’,‘ जत्रा’,‘घोळात घोळ’,‘येऊ का घरात’ या सारख्या अनेक चित्रपटांतील विजय चव्हाण यांच्या भूमिका गाजल्यात. मोरूची मावशी या त्यांच्या नाटकाने तर इतिहास रचला.मृणाल कुलकर्णी या अभिनेत्रीनेही मराठी, हिंदी अशा दोन्ही भाषेत काम केले. छोटा पडदाही तिने गाजवला. अभिनेत्री म्हणूनचं नाही तर एक गुणी दिग्दर्शिका ही ओळखही तिने निर्माण केली.