धर्मेंद्र यांनी नुकतीच डान्स दिवाने या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील काही थक्क करणारे प्रसंग सांगितले. धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची प्रेमकथा तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. पण हेमा मालिनी यांच्या आधी धर्मेंद्र एका अभिनेत्रीच्या मागे वेडे झाले होते. त्यांनीच खुद्द ही कबुली या कार्यक्रमात दिली आहे.
चौदहवी का चाँद हा चित्रपट पाहिल्यानंतर मी वहिदा रहमान यांच्या मागे वेडे झालो होतो अशी कबुली धर्मेंद्र यांनी नुकतीच डान्स दिवाने या कार्यक्रमात दिली आहे. तसेच त्यांनी या कार्यक्रमात सांगितले की, बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर मी अनेकवेळा वहिदा यांना भेटण्याचा प्रयत्न केला. काही फिल्मी पार्टींमध्ये त्यांना भेटण्याचा योग देखील आला. पण माझ्या भावना त्यांना सांगण्याची माझी हिंमत झाली नाही.
वहिदा रहमान आणि आशा पारेख यांनी सुपरस्टार सिंगर या कार्यक्रमात काही महिन्यांपूर्वी हजेरी लावली होती. त्यावेळी धर्मेंद्र यांनी व्हिडिओद्वारे एक संदेश दिला होता. त्यांनी सांगितले होते की, मला वहिदा यांच्यासोबत बाझी या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. कॅमेर्यासमोर असेपर्यंत मी माझ्या भूमिकेत शिरलेलो असायचो. पण कॅमेर्याच्या मागे मात्र मी पुन्हा तसाच बुजरा आणि अंतर्मुख होऊन जात असे. तुम्ही मला खूप आधार दिला आणि मदत केली.”