बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या आजारी आहेत. नुकतेच त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना डेंग्यूची लागण झाली होती. तीन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना सोमवारी हॉस्पिटलमधून रजा देण्यात आली. आता ते त्यांच्या घरी आराम करत आहेत.
मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्यामुळे ते त्यांच्या मुंबईतील घरी कुटुंबासोबत राहत आहेत. ८३ वर्षीय धर्मेंद्र जास्त करून लोणावळामधील फार्महाऊसवर राहतात. त्यांना शेती करायला आवडते. तसेच ते गायींना चारा खाऊ घालतानादेखील दिसतात.
धर्मेंद्र सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत. काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र त्यांचा नातू करण देओलच्या पल पल दिल के पास चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टेलिव्हिजनवरील शोजमध्ये दिसले होते. एका रिएलिटी शोमध्ये त्यांच्या कारकीर्दीच्या सुरूवातीचे फोटो पाहून भावूक झाले होते.
करण देओलच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर हवा तितका कमाल केली नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन सनी देओलने केलं होते. धर्मेंद्र यांनी लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक पोस्ट शेअर केले होते. व्हिडिओमध्ये ते म्हणाले की, जेव्हा मी कधी दुःखी होतो, तेव्हा मी लता मंगेशकर यांचं गाणं ऐकतो आणि सर्व दुःख विसरून जातो.
धर्मेंद्र शेवटचे त्यांचे मुलगे सनी व बॉबी देओल यांच्यासोबत 'यमला पगला दीवाना फिर से'मध्ये दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला होता.