80 व 90 चे दशक बॉलिवूडमध्ये महत्त्वपूर्ण ठरले. या काळात अनेक अभिनेत्रींनी मोठा पडदा गाजवला. आज यापैकी अनेकजणी इंडस्ट्रीतून गायब झाल्या आहेत. अभिनेत्री माधवी (Madhavi) यापैकीच एक. ‘धूप में निकला ना करो रूप की रानी...’ हे गीत आठवत असेल तर माधवीचा चेहराही तुम्हाला आठवेल. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत रोमान्स करताना दिसलेली माधवी 80 च्या दशकात लोकप्रिय अभिनेत्री होती. पण अचानक तिने बॉलिवूडला रामराम ठोकला.
माधवीचा जन्म हैदराबादमध्ये 14 सप्टेंबर 1962 ला झाला. तिने खूपच कमी वयात दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपली एक वेगळी जागा निर्माण केली आणि पुढे ती बॉलिवूडमध्ये आली. अमिताभ बच्चन यांच्यासोबत अंधा कानून, अग्निपथ अशा अनेक सिनेमांत ती झळकली.
थुरपु पद्मारा या तेलगू सिनेमापासून करिअरची सुरुवात करणा-या माधवीने आपल्या करिअरमध्ये जवळपास 300 चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. त्या काळात ती प्रत्येक निर्मात्याची पहिली पसंत होती. आता ही माधवी कुठे आहे, काय करते तर विदेशात राहतेय.1996 साली माधवीने राल्फ शर्मासोबत लग्न केले. दोघांची पहिली भेट हिमालयन इंस्टिस्ट्यूट आॅफ योगा सायन्स अॅन्ड फिलॉसाफीमध्ये झाली होती.
माधवी स्वामी रामा या धार्मिक गुरूंना मानत होती. त्यांनीच त्यांची ओळख राल्फ शर्मा यांच्यासोबत करून दिली. त्यांच्याच आशीवार्दाने माधवी आणि राल्फ यांनी 14 फेब्रुवारी 1996 ला लग्न केले.यानंतर माधवीने हळूहळू चित्रपटात काम करणे थांबवले.लग्नानंतर माधवी पतीसोबत न्यू जर्सीला शिफ्ट झाली. तिच्या पतीचा फार्मास्युटिकलचा बिझनेस आहे. दोघांना प्रिस्सिल्ला, टिफनी व इवेलीन नावाच्या तीन मुली आहे.