बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी 'ॲनिमल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील रणबीरचा लूक चाहत्यांच्या भलताच पसंतीस पडला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरनंतर 'ॲनिमल'बाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. पण, या सिनेमासाठीरणबीर कपूर पहिली पसंत नव्हता. रणबीरआधी दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं, अशी चर्चा होती. 'ॲनिमल'चे दिग्दर्शक संदीप वागा यांनी याबाबत खुलासा केला आहे.
रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. हैदराबादमध्ये 'ॲनिमल' सिनेमाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. यावेळी सिनेमाचे दिग्दर्शक संदीप वागा यांनी महेश बाबूला 'ॲनिमल'ची भूमिका ऑफर करण्याबाबत असलेल्या चर्चांवर मौन सोडलं. "हो, महेश बाबूला मी एक सिनेमा ऑफर केला होता. पण, तो 'ॲनिमल' नव्हता. त्या चित्रपटाचं नाव डेव्हिल होतं. महेशने या सिनेमाला नकार दिला नव्हता. पण, काही कारणामुळे हा सिनेमा होऊ शकला नाही," असं ते म्हणाले.
मीडिया रिपोर्टनुसार, महेश बाबूने तेव्हा स्क्रिप्टमध्ये काही चेंजेस करण्यास सांगितले होते. पण, दिग्दर्शक संदीप वागा यांनी स्क्रिप्टमध्ये बदल करण्यास नकार दिला होता. त्यामुळेच त्यांनी 'ॲनिमल' चित्रपटासाठी रणबीर कपूरला मुख्य भूमिकेत घेतलं. दरम्यान, १ डिसेंबरला 'ॲनिमल' हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसह रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. त्याबरोबरच अनिल कपूर, बॉबी देओल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.