नाना पाटेकर हे सिनेसृष्टीतील मोठं नाव आहे. गेली कित्येक दशकं ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. सध्या नाना पाटेकरांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत नाना पाटेकरांनी सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका चाहत्याला डोक्यात मारल्याचं दिसत आहे. चाहत्याशी नानांनी केलेलं वर्तन पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहे. पण, या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य अखेर समोर आलं आहे.
नाना पाटेकरांचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ 'जर्नी' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. वाराणसी येथे या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. नाना पाटेकरही या चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त वारणसीत आहेत. चित्रपटाचं शूटिंग सुरू असतानाच एक मुलगा येतो आणि नानांबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. नाना रागात त्या मुलाच्या डोक्यात जोरात फटका मारतात. त्यानंतर नानांच्या बाजूला असलेली एक व्यक्ती त्या मुलाला बाजूला घेऊन जाते, असं व्हिडिओत दिसत आहे. आता जर्नी चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी या व्हायरल व्हिडिओबाबत भाष्य केलं आहे.
'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार अनिल शर्मा यांनी हा व्हिडिओ शूटिंगदरम्यानचा असल्याचं म्हटलं आहे. "मला नुकतंच या व्हिडिओबाबत समजलं. मीदेखील तो व्हिडिओ पाहिला. पण, नानांनी कोणालाही मारलं नाही. तर हा चित्रपटातील एक सीन आहे. वाराणसीमधील एका भागात आम्ही याचं शूटिंग करत होतो. ज्यामध्ये नानांना जवळ आलेल्या मुलाच्या डोक्यात मारायचं होतं. शूटिंग सुरू होतं आणि नाना त्याला मारत होते. पण, तिथे असलेल्या लोकांनी हा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करून तो व्हायरल केला. आता सोशल मीडियावर नानांना ट्रोल केलं जात आहे. नकारात्मक आणि रागीट अशी त्यांची इमेज बनवली जात आहे. जे चुकीचं आहे. हा चित्रपटातील सीन आहे. नानांनी कोणालाही मारलेलं नाही".