सध्या सगळीकडे दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. बॉलिवूडकरही दरवर्षी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतात. अनेक सेलिब्रिटींकडून दिवाळी पार्टीचं आयोजनही केलं जातं. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने बॉलिवूडकरांसाठी जंगी दिवाळी पार्टी आयोजित केली होती. या दिवाळी पार्टीला बॉलिवूडमधील सिताऱ्यांनी हजेरी लावली होती. मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीतील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण, या पार्टीतील एका फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीला सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनीही हजेरी लावली होती. ऐश्वर्याने दिवाळी पार्टीसाठी खास लूक केला होता. सलवार कमीजमध्ये ऐश्वर्याचं सौंदर्य खुलून आलं होतं. तर सलमान त्याच्या हटके अंदाजात दिसून आला. या पार्टीतील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये दोन व्यक्ती एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. या फोटोत सलमान आणि ऐश्वर्या असल्याची चर्चा रंगली आहे. ट्वीटरवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानची एन्ट्री होताच ऐश्वर्याने पार्टीतून काढता पाय घेतला होता. पण, व्हायरल झालेल्या फोटोनुसार सलमान आणि ऐश्वर्याने पार्टीत एकमेकांना मिठी मारल्याचं नेटकरी म्हणत आहेत. हा फोटो पाठमोरा असल्यामुळे सलमानबरोबरच्या व्यक्तीचा चेहरा फोटोत दिसत नाहीये. त्यामुळे सलमानबरोबर फोटोत दिसणारी व्यक्ती खरंच ऐश्वर्या आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
सलमानबरोबर फोटोत दिसणारी व्यक्ती कोण?
सलमानबरोबर फोटोत दिसणारी व्यक्ती ऐश्वर्या नसून सूरज पांचोलीची बहीण सना पांचोली आहे. सनानेही मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. त्यामुळे सलमानने पार्टीत ऐश्वर्याला नाही तर सना पांचोलीला मिठी मारली होती.