सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअरची एकेकाळी चांगलीच चर्चा रंगली होती. ते दोघे अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र हजेरी लावत असत. ते दोघे लग्न करणार असे वाटत असतानाच त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. त्या दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय का घेतला याबाबत त्या दोघांनी नेहमीच मौन राखणे पसंत केले. मात्र एका घटनेने मीडियाचे लक्ष वेधून घेतले होते.
ही घटना २००२ साली झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यातली. ज्यात ऐश्वर्या रायने सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. या पुरस्कार सोहळ्यात पोहोचलेल्या ऐश्वर्याचा हात मोडला होता आणि तिने डोळ्यांवर काळ्या रंगाचा मोठा गॉगल घातला होता.
ऐश्वर्याला असे पाहून अनेक चर्चांना उधाण आले होते. सलमान खानने ऐश्वर्याला मारहाण केली असल्याचे तर्कवितर्क बांधले जात होते. मात्र ही गोष्ट जेव्हा ऐश्वर्याला समजली तेव्हा तिने सलमानने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप फेटाळत सांगितले होते की ती पायऱ्यांवरुन घसरून पडल्यामुळे तिची ही अवस्था झाली.