वांद्रे इथल्या झोपडपट्टीत हलाखीचं जीणं जगणारी आणि जादूची कांडी फिरावी तशी स्लमडॉग मिलेनिअर चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्ध झालेली बालकलाकार म्हणजे रुबीना कुरेशी. एका चित्रपटामुळे रुबीना देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाली. मात्र याच रुबीनाबाबत धक्कायक बाब समोर आली होती. एका ब्रिटिश दैनिकाच्या वृत्तानुसार रुबिनाचे वडील रफीक कुरेशी यांनी त्यांच्या मुलीला एका अरब दाम्पत्याला विकण्याचा प्रयत्न केला होता. त्या मोबदल्यात त्यांना २ लाख पौंड मिळणार होते असा आरोपही करण्यात आला. या डीलचा व्हिडिओ असल्याचा दावाही या दैनिकाकडून करण्यात आला होता. तसंच या प्रकरणी रफिकला अटकही झाली होती असा आरोप रफिकच्या पहिल्या पत्नीने केला होता. मात्र वडिलांवरील हे सारे आरोप रुबिनाने फेटाळले होते.
आई वडील माझ्यावर प्रेम करतात, त्यांनी कधीही मला विकण्याचा प्रयत्न केला नाही. ते कधी असा विचारही करू शकत नाही, असं रुबिनाने म्हटलं होतं. तिच्या मते, ती आई वडिलांबरोबर कुणाला तरी भेटायला हॉटेलमध्ये गेली होती. त्याठिकाणी एक महिला आणि एक पुरुष होता. त्यांनी आपल्याला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती असा दावा रुबिनाने केला. मात्र आपल्या वडिलांनी मात्र थेट नकार दिल्याचे तिने सांगितलं. रुबिनाला तिच्या वडिलांनी विकण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्यांनंतर एनआरआय एआर विनू यांनी तिचा संपूर्ण खर्च उचलण्याची इच्छा व्यक्त केली होती. ते रुबिनाचा पीएचडीपर्यंतचा खर्च उचलण्यास तयार होते. त्यांनी रुबिनाच्या वडिलांनाही आर्थिक मदत देऊ केली होती.
शिवाय गरजू आणि गरीब मुलांच्या शिक्षणासाठी ग्रामीण भागात काम करणाऱ्या एका सामाजिक संघटनेशी ते संलग्न होते. मात्र यासाठी रुबिनाच्या वडिलांनी नकार दिला होता. रूबिनाने वयाच्या 9 व्या वर्षी आत्मचरित्र लिहिण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिच्या गरीबीपासून ते स्लमडॉगमुळे मिळालेल्या प्रसिद्धीचा उल्लेख करण्याची तिची इच्छा होती. तिचे हे आत्मचरित्र ब्रिटनची पब्लिशिंग कंपनी ट्रान्सवर्ल्डने प्रकाशित करण्याचे आश्वासन दिले होते.