आलिया भट ही आज बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिने स्टुंडट ऑफ द इयर या तिच्या पहिल्याच चित्रपटाद्वारे ती लंबी रेस का घोडा असल्याचे सगळ्यांना दाखवून दिले आहे. तिने हायवे, गली बॉय असे एकाहून एक हिट चित्रपट आजवर दिले आहेत. तिच्या गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या राझी या चित्रपटाला तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक सगळ्यांनीच केले. या भूमिकेसाठी तिला नुकतेच फिल्मफेअर या पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, आलियाला लहानपणापासूनच या इंडस्ट्रीत येण्याची आवड होती. त्यासाठी तिने प्रयत्न देखील केले होते. पण काही कारणास्तव ही गोष्ट घडू शकली नाही.
संजय लीला भन्साळी आणि आलिया भट इंशाल्लाह या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. या चित्रपटाची घोषणा काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे करण्यात आली. इंशाल्लाह या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करत असून या चित्रपटात आलियाची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाद्वारे संजयच्या चित्रपटात झळकण्याची आलियाची इच्छा पूर्ण होत असल्याने सध्या ती प्रचंड खूश आहे.
संजय लीला भन्साळीचा ब्लॅक हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, राणी मुखर्जी आणि बालकलाकार आयशा कपूर यांची मुख्य भूमिका होती. या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. आयशा ही चिमुकली तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या भूमिकेसाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. संजय लीला भन्साळीने मुंबई मिररला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ब्लॅक या चित्रपटासाठी आलिया तिची आई सोनी राझदान यांच्यासोबत ऑडिशन देण्यासाठी आली होती. ती त्यावेळी नऊ-दहा वर्षांची असेन. त्याचवेळी तिच्या डोळ्यातील चमक पाहून ही मोठी होऊन एक स्टार बनेल याची मला खात्री पटली होती आणि त्याचमुळे मी तिला ब्लॅकसाठी बालकलाकाराचे ऑडिशन द्यायला नकार दिला होता.