कहो ना प्यार है या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांसोबत, समीक्षकांचे देखील मन जिंकले. या चित्रपटाला फिल्मफेअरचे अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. सगळ्यात जास्त फिल्मफेअर पुरस्कार मिळवणारा हा चित्रपट ठरला. या चित्रपटामुळे हृतिक रोशनला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. हृतिकचा हा पहिला चित्रपट असला तरी या चित्रपटात त्याने रोहित आणि राज अशा दोन वेगवेगळ्या भूमिका खूपच चांगल्या प्रकारे साकारल्या होत्या. या पहिल्याच चित्रपटासाठी हृतिकला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. हृतिकने पहिल्याच चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर दमदार एंट्री केली.
कहो ना प्यार है या चित्रपटानंतर मुली हृतिकच्या मागे अक्षरशः वेड्या झाल्या होत्या. या चित्रपटानंतर हृतिकला लग्न करण्याचे अनेक प्रस्ताव देखील आले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटासाठी हृतिक हा निर्मात्यांची पहिली चॉईस कधीच नव्हता. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनीच केली आहे. राकेश रोशन यांनी कहो ना प्यार है या चित्रपटाच्या आधी देखील करण अर्जुन, कोयला यांसारख्या अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये शाहरुख खानने काम केले होते. त्यामुळे कहो ना प्यार है या चित्रपटातदेखील शाहरुख खानने मुख्य भूमिका साकारावी अशी राकेश रोशन यांची इच्छा होती. पण काही कारणास्तव तो या चित्रपटाचा भाग बनू शकला नाही आणि या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी हृतिक रोशनची निवड करण्यात आली तर दुसरीकडे या चित्रपटात हृतिकसोबत करिना कपूर मुख्य भूमिकेत होती.
करिनाने तिच्या चित्रपटसृष्टीतील करियरला सुरुवात देखील केली नव्हती. पण काहीच दिवस चित्रीकरण केल्यानंतर तिने हा चित्रपपट सोडला आणि या चित्रपटात तिची जागा अमिषा पटेलने घेतली. या चित्रपटातील अमिषा पटेल आणि हृतिक रोशनची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. कहो ना प्यार है या चित्रपटाने बॉलिवूडला एक सुपरस्टार मिळवून दिला.