ज्येष्ठ गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनाने संपूर्ण देश दुःखात आहे. सोशल मीडियावरून सतत त्यांना आदरांजली दिली जात आहे. दीदींना शेवटचा निरोप देण्यासाठी अनेक कलाकार पोहोचले होते. यामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूरचादेखील (Shraddha Kapoor) समावेश होता. श्रद्धा मंगेशकर कुटुंबासोबतच दिसून येत होती. याला कारणही तसंच आहे. श्रद्धा आणि लता दीदींमध्ये एक खास नातं आहे. या नात्याबाबत फार कमी जणांना माहिती आहे. त्यांच्यातील नातं जाणून घेण्यासाठी चाहते ही उत्सुक आहेत.
श्रद्धा कपूर अनेक वेळेला लता दीदीं आणि संपूर्ण मंगेशकर कुटुंबासोबतचं फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. लता दीदींच्या निधनांनतही श्रद्धाने काही जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. लता दीदींसोबतचे फोटो शेअर करताना श्रद्धा त्यांचा उल्लेख नेहमी लता आजी म्हणून करायची. याला कारणही तसंच आहे. जाणून घेऊया ते..
श्रद्धा कपूरचे आजोबा पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे लता मंगेशकर यांचे चुलत भाऊ होते. या नात्याने श्रद्धा ही लता मंगेशकर यांची नात आहे. श्रद्धाचे आजोबा हे शास्त्रिय गायक होते. ते सुद्धा एक उत्कृष्ट गायक आणि वीणावादक होते. त्यामुळे श्रद्धाला देखील गायनाची आवड आहे. श्रद्धानं अनेक चित्रपटांमध्ये गाणे गायले आहे. श्रद्धा कपूर आणि लता दीदी यांचे कौटुंबिक संबंध असल्यामुळे अनेक प्रसंगी श्रद्धा प्रभूकुंजवर दिसायची.