श्रद्धा कपूरने दहा वर्षांपूर्वी तीन पत्ती या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात अमिताभ बच्चन, आर.माधवन यांच्या मुख्य भूमिका होत्या. पण तुम्हाला माहीत आहे का, त्याच्या कित्येक वर्षं आधी म्हणजेच श्रद्धा केवळ १६ वर्षांची असताना तिला एका चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली होती. तिनेच ही गोष्ट एका मुलाखतीत नुकतीच सांगितली आहे.
श्रद्धा कपूर १६ वर्षांची असताना तिला चक्क सलमान खानसोबत काम करण्याची ऑफर मिळाली होती. सलमानच्या लकी या चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी तिला विचारण्यात आले होते. तिने या चित्रपटासाठी नकार दिल्यानंतर या चित्रपटात स्नेहा उल्लालची वर्णी लागली. श्रद्धाने मुलाखतीत सांगितले की, माझी शाळा संपल्यानंतर कॉलेजमध्ये जायची स्वप्नं पाहात होती. त्याचवेळी मला लकी या चित्रपटातील भूमिकेविषयी विचारण्यात आले होते. पण त्यावेळी मी खूपच लहान होते. मला खरं तर लहानपणापासूनच चित्रपटात काम करायचे होते आणि त्यातही सलमान खानसोबत चित्रपट करण्याची संधी मिळणार होती. पण तरीही मी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले.
शक्ती कपूरच्या पावलावर पाऊल ठेवून त्याची मुलगी श्रद्धा कपूरने देखील काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. श्रद्धा कपूरने खूपच कमी वेळात एक अभिनेत्री, गायिका, गीतकार आणि डिझायनर म्हणून स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'आशिकी 2', 'एक व्हिलन', 'एबीसीडी 2', 'बागी', 'रॉक ऑन 2' 'स्त्री' अशा तिच्या विविध सिनेमातील भूमिका रसिकांना भावल्या आहेत. आजच्या पिढीची नायिका म्हणून श्रद्धाने तरुणाईच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. तिच्या काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या बागी ३ या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.