Join us

जाणून घ्या कोण आहे पाताल लोकमधील हाथी राम चौधरी?, या चित्रपटांमध्ये केलंय त्याने काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 3:34 PM

पाताल लोकमध्ये हाथी राम चौधरी ही भूमिका जयदीप अहलावतने साकारली असून त्याने याआधी देखील अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

ठळक मुद्देएफटीआयमधून पास झाल्यानंतर जयदीप अभिनयक्षेत्रात संधी शोधण्यासाठी मुंबईत आला. काही वर्षं संघर्ष केल्यानंतर त्याला अक्षय कुमारच्या खट्टा मीठा या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

सध्या सोशल मीडियावर केवळ एकाच गोष्टीची चर्चा आहे आणि ती म्हणजे पाताल लोक वेबसिरिज... ही वेबसिरिज लोकांना प्रचंड आवडत असून या वेबसिरिजची तुलना चक्क सेक्रेड गेम्ससोबत केली जात आहे. या वेबसिरिजमध्ये आपल्याला हाथी राम चौधरीची भूमिका मुख्य पाहायला मिळत असून या व्यक्तिरेखेच्या आणि ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्याच्या लोक अक्षरशः प्रेमात पडले आहेत. त्याच्या अभिनयाची सध्या चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. आज आम्ही तुम्हाला या वेबसिरिजमध्ये हाथी राम चौधरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याविषयी काही खास गोष्टी सांगणार आहोत.

पाताल लोकमध्ये हाथी राम चौधरी ही भूमिका जयदीप अहलावतने साकारली असून त्याने या भूमिकेत अक्षरशः त्याचे प्राण ओतले आहेत असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कारण केवळ एका वेबसिरिजमध्ये मुख्य भूमिका साकारल्यानंतर जयदीपची तुलना चक्क नवाझुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत होत आहे.

जयदीप मुळचा हरियाणाचा असून खरे तर त्याला अभिनेता बनण्याची कधीच इच्छा नव्हती. त्याला भारतीय सैन्यात सामील व्हायचे होते आणि त्याने यासाठी एनडीएची परीक्षा देखील दिली होती. पण या परीक्षेत तो नापास झाला. सैन्यात संधी न मिळाल्याने तो अभिनयक्षेत्राकडे वळला. त्याने एफटीआयसारख्या प्रसिद्ध इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे धडे गिरवले आहेत. एफटीआयमधून पास झाल्यानंतर जयदीप अभिनयक्षेत्रात संधी शोधण्यासाठी मुंबईत आला.

काही वर्षं संघर्ष केल्यानंतर त्याला अक्षय कुमारच्या खट्टा मीठा या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती. तसेच रॉकस्टार या चित्रपटात त्याने रणबीक कपूरच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली आहे. जयदीपने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटातील शाहिद खान या भूमिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.