कंगनाचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी' चा टीझर आऊट झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या टीझरबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. अखेर त्यांची प्रतीक्षा आज संपली आहे. टीझरची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजाने होते. ते आपल्या भारदस्त आवाजात राणी लक्ष्मीबाई यांची गोष्ट सांगत आहेत. यात कंगना इंग्रजांविरोधात लढताना दिसतेय. टीझरच्या शेवटला कंगना 'हर हर महादेवचा' जयघोष करते. देशासाठी इंग्रजांविरोधात लढताना राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. 'मणिकर्णिका' हा सिनेमा राणी लक्ष्मीबाई यांना एक श्रद्धांजली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार 'मणिकर्णिका'साठी कंगनाने खूपच जबरदस्त असे अॅक्शन सीन्स दिले आहेत. तसेच या सिनेमातील राणी लक्ष्मीबाईच्या प्रमुख भूमिकेसाठी कठोर मेहनतसुद्धा घेतली. या सिनेमात घोडेस्वारीसोबतच अनेक स्टंट करताना दिसणार आहे. तिने यासाठी तलवारबाजीचे धडे गिरवले आहेत. ऐवढेच नाही तर स्टंट करताना बॉडी डबलची देखील तिने मदत घेतली नाही. सगळे स्टंट तिने स्वत: केले आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून कंगनाचा हा सिनेमा अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. आधी हा सिनेमा दिग्दर्शक क्रिश दिग्दर्शित करत होते मात्र कंगनाच्या हस्तक्षेपामुळे क्रिश यांनी हा सिनेमा अर्धवट सोडून दिला त्यानंतर कंगना 45 दिवसांचे दिग्दर्शन या सिनेमाचे स्वत: केले. क्रिशनंतर अभिनेता सोनू सूदने देखील हा सिनेमा मध्येच सोडून दिला आहे.
'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' हा चित्रपट पुढील वर्षी 25 जानेवारी 2019 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कंगनाचा रणरागिणी अंदाज व अॅक्शन करताना पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.