Join us

कमल हसन यांच्या विश्वरूपम या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 8:00 AM

kamal hassan यांची मुख्य भूमिका असलेल्या vishwaroopam 2 या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या कित्येक महिन्यांपासून वाट पाहात आहेत.

कमल हसन यांच्या विश्वरूपम या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विश्वरूपम’चा हा दुसरा भाग आहे. कमल हसन यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या कित्येक महिन्यांपासून वाट पाहात आहेत. अॅक्शन आणि थराराने परिपूर्ण असलेला हा ट्रेलर असून या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विश्वरूपम या चित्रपटाच्या यशानंतर याच चित्रपटाचा दुसरा भाग निर्मात्यांनी आणण्याचे ठरवले होते. पण या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान आणि या ट्रेलरच्या प्रदर्शनादरम्यान अनेक अडचणी आल्या. खरे तर या चित्रपटाचे चित्रीकरण गेल्या नोव्हेंबरमध्ये पूर्ण झाले होते. पण हा चित्रपट प्रदर्शित व्हायला खूपच वेळ लागला. आता सगळ्या अडचणींवर मात करत कमल हसन यांनी विश्वरूपम २ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. हा ट्रेलर दोन मिनिटांचा असून या ट्रेलरमध्ये अधिकाधिक वेळ आपल्याला कमल हसन दिसत आहेत. त्यांच्यासोबतच या ट्रेलरमध्ये आपल्याला राहुल बोस, वहिदा रेहमान, पूजा कुमार आणि शेखर कपूर यांसारखे कलाकार पाहायला मिळत आहेत. विश्वरूपम हा चित्रपट प्रेक्षकांना हिंदी, तामिळ आणि तेलगु या भाषांमध्ये पाहायला मिळणार आहे. या तिन्ही भाषांमधील ट्रेलर एकाच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला. आमिर खानने हिंदी ट्रेलर लाँच केला असून कमल हसन यांची मुलगी श्रुती हसन आणि ज्युनिअर एनटीआरने तामिळ आणि तेलुगू ट्रेलर लाँच केला. कमल हसन यांनी मेजर विसाम अहमद काश्मिरीची मुख्य भूमिका साकारलेल्या ‘विश्वरुपम’वर मद्रास हायकोर्टाने तामिळनाडूमध्ये बंदी घातली होती. पण त्यानंतर दोन आठवड्यानी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता तर विश्वरूपम २ मध्ये कमल हासन यांनी रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. १० ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि तामीळ या दोन्ही भाषांमध्ये चित्रीत करण्यात आला असून तेलगू भोषेत डब करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते कमल हसन असून या चित्रपटावर त्यांनी प्रचंड पैसा लावला आहे. Also Read : कमल हासन व गौतमीचे १३ वर्षांचे ‘लिव्ह इन’ नाते तुटण्यामागे श्रुती नाही तर वेगळेच आहे कारण!