बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार (Tragedy King DilipKumar) यांचे निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. त्यांना खारच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. (Dilip Kumar passed away. )
दिलीप कुमार यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. यामुळे त्यांना हिंदुजामध्ये गेल्या महिन्यात दाखल करण्यात आले होते. त्यांची पत्नी सायरा बानू यांनी त्यांना हॉस्पिटलमधून घरी नेण्याची इच्छा व्यक्ती केली होती. यानुसार हॉस्पिटलने दिलीप कुमार यांना नुकताच डिस्चार्ज दिला होता. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
दिलीप कुमार यांना पहिल्यांदा ६ जून रोजी ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. तेव्हा त्यांची प्रकृती स्थिर होती. या काळात त्यांच्या निधनाच्या अफवाही पसरल्या होत्या. तेव्हा दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या ट्विटरवरून ट्विट करत या अफवांचे खंडन केले होते. तसेच दिलीप कुमार यांना ११ जूनला डिस्चार्ज देण्यात आला होता. यानंतर पुन्हा त्यांना हिंदुजामध्ये दाखल करण्यात आले होते. दिलीप कुमार यांना गेल्या काही वर्षांपासून किडणीचा आणि न्यूमोनियाचा त्रास होत होता. दिलीप कुमार यांचा ९४ वा वाढदिवस हा हॉस्पिटलमध्येच साजरा करण्यात आला होता.
दिलीप कुमार यांनी भारतीय सिनेसृष्टीला एकसो एक असे गाजलेले चित्रपट दिले आहेत. यामध्ये नया दौर, मुघल ए आझम, देवदास, राम और शाम, अंदाज, मधुमती आणि गंगा जमुना या चित्रपटांचा समावेश आहे. १९९८ ला त्यांनी किला हा शेवटचा चित्रपट केला होता.