Join us

दिलीपकुमार यांची प्रकृती पुन्हा बिघडली; आयसीयूमध्ये दाखल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2017 2:04 PM

अभिनेते दिलीपकुमार यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना बुधवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज (गुरुवार) सकाळीच ...

अभिनेते दिलीपकुमार यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना बुधवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज (गुरुवार) सकाळीच बातमी आली होती की, दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. परंतु पुन्हा दिलीपकुमार यांची प्रकृती बिघडली असल्याची बातमी समोर येत असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा होत नसल्याने त्यांना रुग्णालयाच्या आयसीयू विभागात दाखल करण्यात आले आहे. डिहायड्रेशनमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीपकुमार यांना होत असलेल्या किडनीचा त्रास अद्यापपर्यंत कमी झालेला नाही. त्यामुळे सध्या त्यांच्या किडनीवर उपचार सुरू आहेत. डॉ. जलील पपारकर आणि किडनी स्पेशालिस्ट डॉ. नितीन गोखले त्यांच्यावर यासंबंधी उपचार करीत आहेत. याव्यतिरिक्त इतरही डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. मात्र डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीतील सुधारणेविषयी काहीही सांगण्यास असमर्थता दर्शविल्याने चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वास्थ्य असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीविषयी चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात असल्याने, त्यांची पुतणी आणि अभिनेत्री सायशाची आई शाहीन सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देत असे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘युसूफ ऊर्फ दिलीपकुमार अंकल लवकरच बरे होतील. फॅन्सच्या प्रार्थनेमुळे त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे.’परंतु बुधवारी त्यांची प्रकृती जास्तच बिघडल्यामुळे त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना त्यांच्या चाहत्यांकडून केली जात आहे.