मीका सिंगनंतर बॉलिवूडचा आणखी एक सेलिब्रिटी वादात सापडला आहे. हा सेलिब्रिटी दुसरा कुणी नसून बॉलिवूड अभिनेता व सिंगर दिलजीत दोसांज आहे. दिलजीत अमेरिकेत परफॉर्म करणार आहे. पण त्याआधी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने (FWICE) त्याच्या या नियोजित कार्यक्रमावर आक्षेप नोंदवला आहे.FWICEने परराष्ट्र मंत्रालयाला एक पत्र लिहून दिलजीतचा अमेरिकेतील हा इव्हेंट रद्द करण्याची मागणी केली आहे.
का आहे आक्षेपदिलजीत येत्या 21 सप्टेंबरला अमेरिकेत आयोजित इव्हेंटमध्ये परफॉर्म करणार आहे. पण FWICE चे मानाल तर पाकिस्तानच्या रेहान सिद्दीकीने हा इव्हेंट आयोजित केला आहे. ‘दिलजीत एक शानदार सिंगर आहे. पण रेहान सिद्दीकीने त्याला फूस लावली. दिलजीतने या प्रोग्रामध्ये परफॉर्म केल्यास भारत-पाकिस्तानमधील सद्याचे संबंध बघता एक चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे दिलजीतला या इव्हेंटसाठी दिला गेलेला अमेरिकेचा व्हिसा रद्द करण्यात यावा, अशी विनंती आम्ही या पत्राद्वारे करत आहोत. या पत्राद्वारे आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले. यावर सरकार तातडीने कारवाई करेल, अशी अपेक्षा आहे,’ असे FWICEने आपल्या पत्रात म्हटले आहे.
रेहान सिद्दीकी यानेच पाकिस्तानात मीका सिंगचा इव्हेंट आयोजित केला होता. या इव्हेंटमध्ये परफॉर्म करत असतानाचा मीकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून मोठा वाद उठला होता. यानंतर भारतात त्याच्यावर काम करण्यास बंदी लादली गेली होती. अर्थात मीकाच्या माफीनंतर ही बंदी उठवण्यात आली होती. ‘ मी सर्वांची माफी मागतो. यापुढे असे होणार नाही. व्हिसा मिळाला तर कुणीही पाकिस्तानात जाणार. तुम्हाला मिळाला तर तुम्हीही जाणार. मला मिळाला आणि मी गेलो. मी खूप आधी या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले होते. पण मी तिकडे परफॉर्म करत होतो आणि इकडे भारत सरकारने कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला. हा केवळ एक योगायोग होता,’ असे स्पष्टीकरण मीकाने दिले होते.