दिलजीत दोसांजच्या सूरमा या चित्रपटाची गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चा आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट हॉकी या खेळातील एका हिरोच्या आयुष्यावर आधारित आहे. हॉकीच्या मैदानावरचा चकाकता तारा म्हणजेच, हॉकीचे माजी कर्णधार संदीप सिंह यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट असल्याने या चित्रपटाकडून सगळ्यांच्या खूपच अपेक्षा होत्या. या चित्रपटाला समीक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता आणि आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई करत आहे.हॉकी हे करिअर म्हणून स्वीकारण्यापासून तर हे करिअर अगदी अत्त्युच्च शिखरावर असताना एका जीवघेण्या अपघातात पायातील गेलेली शक्ती परत मिळवण्यापर्यंत संदीप सिंह यांचा प्रवास प्रेक्षकांना सूरमा या चित्रपटात पाहायला मिळतोय. या भूमिकेला दिलजीत दोसांजने योग्य न्याय दिला आहे. हा चित्रपट 13 जुलैला प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 3.25 कोटी कमावले आहेत. या चित्रपटाचे सकाळचे शो हाऊसफूल गेले नसले तरी दुपारनंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. दिलजीत दोसांज हा पंजाबमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याची लोकप्रियता ही प्रचंड आहे. त्यामुळे भारताच्या इतर भागांपेक्षा उत्तरेकडील भागात सूरमा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत सांगितले आहे. या चित्रपटाच्या कलेक्शनची सुरुवात सकाळी खूपच संथ झाली होती (दिलजीत दोसांजच्या लोकप्रियतेमुळे उत्तरेकडील भागात चित्रपटाला ओपनिंग खूपच चांगली मिळाली) पण दुपारनंतर या चित्रपटाने सगळ्याच भागात खूपच चांगले कलेक्शन करायला सुरुवात केली आहे. हा चित्रपट शनिवारी, रविवारी तर नक्कीच चांगली कमाई करेल. शुक्रवारी या चित्रपटाने पहिल्याच दिवसांत 3.25 करोड कमावले आहेत. सूरमा या चित्रपटाचे दिग्दर्शन शाद अलीने केले असून दिलजीत सोबतच अंगद बेदी, तापसी पन्नू, विजय राज यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
दिलजीत दोसांजचा ‘सूरमा’ जिंकतोय प्रेक्षकांचे प्रेम, पहिल्याच दिवशी कमवले इतके पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 4:14 PM