पदार्पणाच्या पहिल्याच चित्रपटाने खळबळ उडवणारी अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा आज (8 जून) वाढदिवस. पहिला चित्रपट सुपरडुपर हिट ठरल्यानंतर अचानक ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर जाण्याचा निर्णय घेणा-या कदाचित डिंपल पहिल्याच. पहिला चित्रपट सुपरहिट झाला आणि त्यानंतर तब्बल 11 वर्षांनंतर डिंपल यांचा दुसरा सिनेमा आला. 1973 मध्ये आलेल्या ‘बॉबी’ या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि या पहिल्याचे चित्रपटाने त्या एका रात्रीत स्टार झाल्या. यावेळी डिंपल केवळ १६ वर्षांच्या होत्या. या पहिल्या चित्रपटात त्यांच्या अपोझिट होते ऋषी कपूर.
‘बॉबी’मध्ये डिंपल यांनी एका साध्या-भोळ्या मुलीची भूमिका केली. पण अतिशय मॉडर्न पद्धतीने. या चित्रपटात त्या शॉर्ट स्कर्टमध्ये दिसल्या. पहिल्याच सिनेमा बिकिनी घालून डिंपलने धुमाकूळ घातला.
‘बॉबी’ रिलीज होण्याआधीच डिंपल यांची ओळख राजेश खन्नांशी झाली होती. राजेश खन्ना डिंपलच्या प्रेमात आकंठ बुडाले. इतके की ‘बॉबी’ रिलीज होण्याआधीच त्यांनी डिंपलसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. डिंपल हा लग्नाचा प्रस्ताव नाकारू शकल्या नाहीत आणि डिंपल यांनी स्वत:पेक्षा १५ वर्षे मोठ्या राजेश खन्नांशी लग्न केले. मात्र ‘बॉबी’मुळे राजेश खन्ना व डिंपल यांना त्यांचे हनीमून रद्द करावे लागले होते. इतकेच नाही तर ‘बॉबी’मधील अनेक सीन्समध्ये त्यांना आपले हातही लपवावे लागले होते. कारण डिंपलच्या हातांवर मेहंदी होती.
खरे तर ‘बॉबी’ हिट झाल्यावर डिंपल यांच्या घरासमोर दिग्दर्शकांची रांग लागली होती. पण राजेश खन्ना यांनी डिंपल यांना लग्नानंतर चित्रपटांत काम करण्यास मनाई केली होती. यामुळे डिंपल यांनी बॉलिवूड व अभिनयापासून फारकत घेतली. राजेश खन्ना व डिंपल यांना दोन मुली झाल्यात. पण १९८२ मध्ये डिंपल व राजेश खन्ना यांच्यात मतभेद निर्माण झाले. दोघेही विभक्त होण्यापर्यंत हे वाद विकोपाला गेले. १९८४ मध्ये राजेश खन्नापासून विभक्त झाल्यावर डिम्पल पुन्हा अभिनयाकडे वळल्या. विश्वास बसणार नाही पण यानंतर डिंपल यांनी हिट चित्रपटांची रांग लावली. ऐतबार, लावा, अर्जुन, सागर, पाताल भैरवी, जाबांज, इंसानियत का दुश्मन, काश असे अनेक हिट चित्रपट त्यांनी दिलेत.